आयसीसी पुरूष टी२० विश्वचषकाचा पहिला हंगाम २००७मध्ये खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या विश्वचषकात भारत विजेता ठरला होता. २०२४मध्ये शेवटची आवृत्ती खेळली गेली असून या प्रकारचे झटपट क्रिकेट लवकरच लोकांच्या पसंतीला आले. आता २०२६चा टी२० विश्वचषकाचा दहावा हंगाम आहे. ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेच्या ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ची यादी पाहिली तर भारताच्या दोन खेळाडूंनी हा मान पटकावला आहे.
भारताकडून विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी टी२० विश्वचषकात ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार जिंकला आहे. त्याचबरोबर विराट हा एकमेव खेळाडू आहे ज्याने दोनदा हा पुरस्कार पटकावला आहे.
विराटने २०१४ आणि २०१६च्या टी२० विश्वचषकात मालिकावीर ठरला होता. त्याने २०१४च्या आवृत्ती एकट्याच्या बळावर संघाला अंतिम फेरीत नेले होते. यामध्ये त्याने ६ सामन्यात ३१९ धावा केल्या होत्या. २०१६मध्ये त्याने वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी केल्या होत्या. त्याच्या या उत्तम खेळीमुळे संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. तसेच बुमराहने २०२४च्या विश्वचषकात त्याच्या घातक गोलंदाजीने विरोधी संघाला त्रास दिला होता. तो या आवृत्तीचा ‘प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट’ ठरला होता.
भारताने २००७ आणि २०२४मध्ये टी२० विश्वचषक जिंकला आहे. त्यामध्ये अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहू.
टी२० विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान आमने-सामने आले होते. त्यामध्ये भारताच्या स्टार अष्टपैलू इरफान पठाणने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने ४ षटकात १६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे तो सामनावीर ठरला होता. त्याने शोएब मलिक, आफ्रीदी आणि यासिर अराफत यांना बाद केले होते.
२०२४च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताच्या विराटने फलंदाजीत तर बुमराहने गोलंदाजीत उत्तम कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या सामन्यात विराटने ७६ धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो प्लेयर ऑफ द मॅच ठरला होता. त्याच सामन्यात बुमराहने ४ षटकात १८ धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या.
टी२० वर्ल्ड कपमधील ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ यादी
२००७ – शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
२००९ – तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)
२०१० – केविन पीटरसन (इंग्लंड)
२०१२ – शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया)
२०१४ – विराट कोहली (भारत)
२०१६ – विराट कोहली (भारत)
२०२१ – डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
२०२२ – सॅम करन (इंग्लंड)
२०२४ – जसप्रीत बुमराह (भारत)





