क्रिकेटविश्वात बुधवारी (११ फेब्रुवारी) चाहत्यांना टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम सामना पाहायला मिळाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचा निकाल ४० षटकानंतर नाही, पहिल्या सुपर ओव्हरनंतर नाही तर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये लागला. यामध्ये दक्षिण आफ्रिका कसा हरता-हरता जिंकला, हे जाणून घेऊ.
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉक आणि रायन रिकल्टनच्या अर्धशतकामुळे २० षटकात ६ विकेट्स गमावत १८७ धावा केल्या. त्याच्याबदल्यात अफगाणिस्तानने १९.४ षटकात १० विकेट्स गमावत तेवढ्याच धावा केल्या. यामध्ये रहमानुल्लाह गुरबाजची खेळी उत्तम ठरली. त्याने ४२ चेंडूत ८४ धावा केल्या. एका वेेळेला वाटले अफगाणिस्तान जिंकेल, मात्र मार्को यान्सेनने सामना पालटला.
यान्सेनने १९व्या षटकात २ विकेट्स घेत केवळ ११ धावा दिल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात अफगाणिस्तानला जिंकण्यासाठी १३ धावांची आवश्यकता होती. २०वे षटक कगिसो रबाडाने टाकले. सुरूवातच त्याने नो-बॉलने केली. त्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर नूर अहमदने षटकार मारला आणि पुन्हा एकदा सामना अफगाणिस्तानच्या बाजूने केला. तिसरा चेंडू निर्धाव गेला. चौथ्या चेंडूवर मात्र भलतेच घडले. नो-बॉल टाकल्यावर रबाडाने पुन्हा चेंडू टाकला आणि फजलहक फारुकी एक धाव घेत दुसऱ्यासाठी पळाला असता धावबाद झाला. येथे यान्सेनने त्याची कमाल दाखवत चेंडू रबाडाकडे टाकला आणि अफगाणिस्तानने त्यांची शेवटची विकेट गमावली. त्याचबरोबर सामना या विश्वचषकाच्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये गेला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने गोलंदाजीत उत्तम कामगिरी केली. त्याने ४ षटकात २६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानकडून गुरबाज आणि अझमतुल्लाह फलंदाजीला आले. एनगिडीने टाकलेल्या त्या षटकात अफगाणिस्तानने १७ धावा वसूल केल्या. यामध्ये अझमतुल्लाहने दोन चौकार आणि एक षटकार मारला. ते षटक असे होते- ४, ६, १, १, ४, १.
तसेच विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करण्यास दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविस फलंदाजीला आले. त्यामध्ये मिलरने पहिल्याच चेंडूवर एकेरी, तर दुसऱ्या चेंडूवर ब्रेविसने षटकार मारला आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवर तो विकेट गमावून बसला. नंतर आलेल्या ट्रिस्टन स्टब्सने एक चौकार-एक षटकार मारत सामना पुन्हा बरोबरीत केला. ( ते षटक असे – १, ६, विकेट, ४, ०, ६.)
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून मिलर आणि स्टब्स आले. अझमतुल्लाहने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर स्टब्सने षटकार मारला. नंतर मिलरने दोन षटकार मारले आणि दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला जिंकण्यासाठी २४ धावांचे लक्ष्य दिले. ते षटक असे – ६, १, २, ६, ६, २.
अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी आणि अझमत फलंदाजीला आले. दक्षिण आफ्रिकेकडून ते षटक केशव महाराजने टाकले. नबी महाराजच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या गुरबाजने लागोपाठ तीन षटकार मारले. मात्र शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला आणि अफगाणिस्तानने ४ धावांनी सामना गमावला. ते षटक असे – ०, विकेट, ६, ६, ६, वाईड, विकेट.





