आज आयसीसीने २०१७ या वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा केली. या अपेक्षेप्रमाणे या संघाचं कर्णधारपद भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे देण्यात आले तर यष्टीरक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकला संघात स्थान देण्यात आले.
१,२. डीन एल्गार आणि डेव्हिड वॉर्नर
या संघात सलामीवीर म्हणून दीन एल्गार आणि डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंचा समावेश करण्यात आला. या दोन्ही खेळाडूंनी यावर्षी चांगली कामगिरी करताना जवळपास १४०० धावा कसोटीत जमवल्या. विशेष म्हणजे दोघेही १६च सामने खेळले आहेत.
३. विराट कोहली
तिसऱ्या स्थानावर या संघात आयसीसीने विराट कोहलीला स्थान दिले आहे. ८ शतके आणि ३ अर्धशतके, त्याचबरोबर या काळात विराटने केलेल्या २०२३ धावा याचमुळे तो या संघात तिसऱ्या क्रमांकावर निवडला गेला. विशेष म्हणजे भारतीय संघाला कोणत्याही मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले नाही.
४.स्टिव्ह स्मिथ
१६ सामन्यात ७८.१२च्या सरासरीने १८७५ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला त्याच्या ऑस्ट्रेलिया संघात असलेल्या क्रमांकावरच याही संघात कायम ठेवण्यात आले आहे. या संघात त्याची कर्णधार म्हणून निवड न होण्याचे कारण म्हणजे भारतीय उपखंडात त्यातही बांगलादेशमध्ये झालेला पराभव. परंतु एक फलंदाज म्हणून तो सलग ३ वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी राहिला आहे.
५.चेतेश्वर पुजारा
१९ सामन्यात १९१४ धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला या संघात ५व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघातून या काळात फक्त कर्णधार विराट कोहलीने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
६.बेन स्टोक्स
६व्या क्रमांकावर अपेक्षेप्रमाणे सध्याच्या घडीचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू इंग्लडच्या बेन स्टोक्सला संधी देण्यात आली आहे. त्याने १४ सामन्यात १००० धावा आणि ३५ विकेट्स घेतल्या आहेत.
७. क्विंटन डीकॉक
या संघात दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. त्याने या काळात १६ सामन्यात त्याने १००६ धावा केल्या.
८. आर अश्विन
या संघात एक फिरकीपटू म्हणून आर अश्विनला संधी देण्यात आली असून त्याने १९ सामन्यात या काळात १११ विकेट्स घेतल्या आहेत. गेल्यावेळी अश्विनला सर्वोत्तम क्रिकेटपटूंचा पुरस्कार मिळाला होता.
९. मिचेल स्टार्क
ऑस्ट्रेलियाला यावेळी ऍशेस मालिका जिंकून देण्यात मोलाची कामगिरी पार पडणाऱ्या मिचेल स्टार्कची कामगिरी त्यापूर्वीही चांगलीच झाली आहे. ११ सामन्यात त्याने ५२ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून त्याचा समावेश करण्यात आला आहे.
१०. कागिसो रबाडा
गेल्याच आठवड्यात आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्याचा मान मिळालेला खेळाडू कागिसो रबाडाला गतवर्षीही तेवढीच चांगली कामगिरी केल्यामुळे या संघात स्थान देण्यात आले आहे. या संघात स्थान देण्यात आलेला तो सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने १५ सामन्यात ७६ विकेट्स घेतल्या आहेत.
११.जेम्स अँडरसन
सध्या कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून ज्याकडे पाहिले जाते त्या इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला या संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने या काळात १४ सामन्यात ५९ विकेट्स घेतल्या आहेत.