आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी जगभरातील संघ एकमेकांसोबत भिडताना दिसत आहेत. आशिया चषक 2023 स्पर्धेत एकीकडे, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश संघ सामने खेळत आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातही वनडे मालिका खेळली जात आहे. एवढंच नाही, तर इंग्लंड आणि न्यूझीलंड संघातही वनडे सामने सुरू आहेत. अशात आयसीसीकडून वनडे रँकिंग जाहीर केली गेली आहे. यावेळी रँकिंगमध्ये मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे. विशेषत: भारतीय खेळाडूंना याचा चांगलाच फायदा झाला आहे.
साडे चार वर्षांपेक्षा जास्त काळात पहिल्यांदाच भारताचे तीन फलंदाज आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल 10 स्थानी जागा मिळवण्यात यशस्वी झाले. यापूर्वी 2019मध्ये भारताचा शिखर धवन, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) अव्वल 10मध्ये होते.
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये बाबर आझम अव्वलस्थानी कायम
नवीन आयसीसी वनडे रँकिंग (ICC ODI Rankings) क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या रँकिंगमध्ये पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अजूनही अव्वलस्थानी कायम आहे. त्याची रेटिंग 863 इतकी आहे. यापूर्वी त्याची रेटिंग 882 इतकी होती. मात्र, मागील काही सामन्यातील खराब प्रदर्शनामुळे ती कमी झाली. तरीही तो यादीत अव्वलस्थानी आहे. अशातच शानदार प्रदर्शन करणाऱ्या शुबमन गिल (Shubman Gill) याला चांगला फायदा मिळाला आहे. गिल यापूर्वी 750च्या रेटिंगसह तिसऱ्या स्थानी होता. मात्र, आता त्याची रेटिंग वाढून 759 झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तो लवकरच बाबरला अव्वलस्थानासाठी आव्हान देताना दिसू शकतो.
डेविड वॉर्नरलाही फायदा
यानंतर तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा रासी वान डर दुसेन आहे. त्याची रेटिंग 777 होती, जी आता 745 झाली आहे. त्याला एक स्थानाचा फटका बसला आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेविड वॉर्नर याने मागील आठवड्यात चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याला रेटिंगमध्येही फायदा झाला. तो 739 रेटिंगसह चौथ्या स्थानी पोहोचला. यापूर्वी तो सहाव्या स्थानी होती. तसेच, पाकिस्तानचा इमाम उल हक याला अलीकडे चांगली कामगिरी करता न आल्यामुळे त्याला नुकसान झाले आहे. तो 735च्या रेटिंगसह पाचव्या स्थानी घसरला आहे.
हॅरी टेक्टर अव्वल 10 स्थानी
आयर्लंडचा फलंदाज हॅरी टेक्टर हा आता यादीत सहाव्या स्थानी आला आहे. मागील आठवड्यात त्याची रेटिंग 726 इतकी होती. ही रँकिंग आताही तितकीच आहे, पण तो पाचव्या स्थानाहून एक स्थानाच्या नुकसानीसह सहाव्या स्थानी पोहोचला. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक याला एक स्थानाचा फायदा झाला असून तो 721 रेटिंगसह सातव्या स्थानी पोहोचला आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्माला फायदा
विराट कोहली याला वनडे रँकिंगमध्ये दोन स्थानांचा फायदा झाला आहे. यापूर्वी तो 695 रेटिंगसह दहाव्या स्थानी होता. आता तो 715 रेटिंगसह आठव्या स्थानी आहे. रोहित शर्मा याने पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक ठोकले होते. त्यामुळे तो पुन्हा एकदा अव्वल 10मध्ये आला आहे. तो 707 रेटिंगसह नवव्या स्थानी विराजमान झाला. यापूर्वी तो 11व्या स्थानी होता. तसेच, पाकिस्तानचा फखर जमान हा सातत्याने खालच्या स्थानी घसरत आहे. तो 705 रेटिंगसह दहाव्या स्थानी आहे. (icc odi rankings babar azam to virat kohli this cricketers in top 10 asia cup 2023)
हेही वाचा-
प्रेक्षकांच्या हाणामारीने भारत-श्रीलंका सामन्याला गालबोट! स्टेडिअममध्येच भिडले फॅन्स; व्हिडिओ तुफान व्हायरल
‘विराट आणि रोहितसारख्या खेळाडूंना वयामुळे टी20 संघाबाहेर करणे धोकादायक’, इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे भाष्य