मुंबई । बुधवारी जाहीर केलेल्या आयसीसीच्या वनडे क्रमवारीत, भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले आहे. कोहलीने 871 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. रोहित (855) आणि पाकिस्तानचा बाबर आझम (829) दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट पहिल्या स्थानावर आहे.
फलंदाजीच्या यादीमध्ये आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबर्ने इंग्लंडविरुद्ध साऊथॅम्प्टन येथे झालेल्या अंतिम सामन्यात 113 धावा केल्याने 42व्या स्थानावर आहे तर उपकर्णधार पॉल स्टर्लिंग 142 धावांची खेळी करुन 26 व्या स्थानावर पोहचला आहे. कर्टिस कॅम्फरने पहिल्या मालिकेत प्रभावित केले आणि त्याला दोनदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि दोन्ही वेळा अर्धशतक झळकाविल्यामुळे त्याने 191 व्या पासून फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला.
गोलंदाजांच्या यादीत आयरिश वेगवान गोलंदाज क्रेग यंगने मालिकेत सहा विकेट्स घेत करिअरच्या सर्वोत्तम 89 व्या स्थानावर झेप घेतली, तर मार्क एडरे 138 व्या स्थान आणि जोशुआ लिटल 146 व्या क्रमांकावर स्थान मिळविण्यात यशस्वी झाला. या मालिकेत इंग्लंडने 2-1 असा विजय मिळवला.
इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने अंतिम वनडे सामन्यात शतक झळकावले आणि त्याने 22वे स्थान मिळवले. जॉनी बेअरस्टो एका स्थानाने पुढे सरकत 13 व्या स्थानावर आला. सॅम बिलिंग्ज 132 धावा करुन 146 व्या स्थानावर पोहचला. इंग्लंडचा गोलंदाज लेगस्पिनर आदिल रशीद 29 व्या स्थानावरुन 25 व्या स्थानावर आला आहे. इंग्लंडने आयर्लंडविरुद्धची मालिका जिंकून 20 गुणांची कमाई केली तर आयर्लंड जवळ दहा गुण आहेत.