मिडल-ईस्टमध्ये सध्या वातावरण चांगलेच तापले आहे, त्यमुळे अनेक देशांचे नुकसान झाले आहे. तसेच क्रिकेटवरही त्याचे परिणाम झाले आहेत. यूएसए-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. त्यामुळे नेपाळमध्ये सुरू असलेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप लीग -२ स्पर्धेतील सामने रद्द केले गेले आहेत. हे सामने काठमांडूच्या त्रिभुवन यूनिवर्सिटी इंटरनॅशनल ग्राउंडवर खेळले जाणार होते.
या लीगच्या आधारित नेपाळ, ओमान आणि यूएई यांच्यात एक तिरंगी मालिका होणार होती, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही मालिका रद्द केली गेली आहे. या मालिकेत सहा सामने खेळले जाणार होते. याच्याशी संबधित माहिती नेपाळ क्रिकेटने त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून दिली आहे. आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप लीग-२चे सामने नेपाळच्या काठमांडूमध्ये १० मार्चपासून सुरू होणार होते. सद्यस्थिती पाहता सर्व क्रिकेट बोर्डने एकमताने ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयसीसीकडून खेळण्यात येणारी ही लीग पुढील वर्षीच्या वनडे विश्वचषक २०२७चा पात्रता फेरीचा महत्वाचा भाग आहे. हा विश्वचषक दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वेमध्ये खेळला जाणार आहे. वर्ल्ड कप लीग-२मध्ये आठ संघ आहेत. ही लीग तीन वर्षापासून खेळली जाते आणि त्यामधील अव्वल चार संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतात. तसेच या विश्वचषकात एकूण १० संघ खेळले जाणार आहेत.
लीगचे सामने रद्द झाल्याने पुढील फेरी एप्रिलमध्ये खेळली जाणार आहे. ज्यामध्ये स्कॉटलंड, ओमान आणि नामिबिया यांचा समावेश असेल. या लीगमध्ये यूएसए, स्कॉटलंड, नेदरलॅंड्स, ओमान, कॅनडा, नामिबिया, नेपाळ आणि युएईचा समावेश आहे. यूएसए २४ पैकी १८ सामने जिंकत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.






