आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (29 जुलै) पुरुषांची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारताचा युवा स्टार वैभव सूर्यवंशीने लक्षवेधी झेप घेतली आहे. त्याने झिम्बाब्वे दौऱ्यात प्रभावी कामगिरी करत टी20 क्रमवारीत तब्बल 230 स्थानांची झेप घेतली आहे. त्याचबरोबर वनडे क्रमवारीतही मोठा बदल झाला आहे. न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलचे अव्वल स्थान संपुष्टात आले आहे.
वैभवने झिम्बाब्वे दौऱ्यातील तीन टी20 सामन्यांमध्ये दोन अर्धशतकी खेळी करताना सर्वाधिक 151 धावा केल्या. त्यामुळे तो ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ ठरला. आता त्याने आयसीसी क्रमवारीत मोठी उडी घेतली आहे. तो झिम्बाब्वे दौऱ्याआधी या क्रमवारीत 278 व्या स्थानी होता. आता ताज्या क्रमवारीनुसार तो टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत 48 व्या स्थानी पोहोचला आहे.
अभिषेक शर्माने झिम्बाब्वे दौऱ्यात निराशाजनक कामगिरी केल्याने तो क्रमवारीत एका स्थानाने घरसला आहे. तो आता फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आला आहे. विकेटकीपर-फलंदाज इशान किशन अव्वलस्थानी कायम आहे.
झिम्बाब्वेमधील मालिकेच्या दुसऱ्या सामन्यानंतर किशनने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंग मिळवले. या डावखुऱ्या फलंदाजाने 81 धावा करून आपले रेटिंग 916 गुणांपर्यंत वाढवले. हे रेटिंग त्याचा संघसहकारी अभिषेक शर्मा (931 रेटिंग) आणि इंग्लंडचा डेव्हिड मलान (919) यांच्यानंतर आतापर्यंतचे तिसरे सर्वोच्च फलंदाजी रेटिंग आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेनंतर मात्र त्याचे रेटिंग 910 झाले आहे.
तसेच भारतीय टी20 उपकर्णधार तिलक वर्मालाही क्रमवारीत फायदा झाला आहे. त्याने दोन स्थानांची प्रगती करत सहावे स्थान गाठले आहे.
वैभवेचे रेटिंग 536 असून तो ज्याप्रकारे कामगिरी करत आहे, ते पाहता तो लवकरच आणखी प्रगती करत इतर भारतीय खेळाडूंसारखे रेटिंग मिळवेल.
वनडे क्रिकेट क्रमवारीतही भारतासाठी आनंदाची बातमी आहे. न्यूझीलंडचा फलंदाज मिचेल वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्याला मुकला होता. त्याचा परिणाम म्हणून त्याचे अव्वल स्थान गेले आणि गिल पहिल्या स्थानी परतला आहे. मिचेल या स्थानावर जानेवारीपासून होता.
गिलचे 801 रेटिंग पॉइंट्स झाले असून मिचेल 794 रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानी आला आहे. या क्रमवारीच्या पहिल्या पाचमध्ये गिलसोबत भारताचे अनुभवी विराट कोहली आणि रोहित शर्माही उपस्थित आहेत. (ICC Rankings Vaibhav Sooryavanshi makes huge rise and shubman gill reclaimed his position as top-ranked batter in ODI)
आयसीसी पुरुषांच्या वनडे फलंदाजी क्रमवारीत विराट 767 रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या आणि रोहित 758 रेटिंग पॉइंट्ससह चौथ्या स्थानी आहे.
वनडे क्रमवारीतही मोठा बदल झाला आहे. पहिल्या स्थानी अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान अव्वलस्थानी कायम आहे, मात्र नामिबियाचा फिरकीपटू बर्नार्ड शोल्ट्झ याने पाच स्थानांची झेप घेत सातवे स्थान गाठले आहे. त्याने आयसीसी पुरुष विश्वचषक क्रिकेट लीग 2 मधील नेपाळ आणि नेदरलॅंड्सविरुद्धच्या तिरंगी मालिकेत प्रभावी कामगिरी केली.
कसोटी क्रमवारीत वेस्ट इंडिजच्या दोन गोलंदाजांनी पहिल्या दहामध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात त्रिनिदाद येथे पहिला कसोटी सामना खेळला गेला, ज्यामध्ये यजमानांनी विजय मिळवला. यामध्ये सलग पाच निर्धाव षटके टाकल्यामुळे जस्टिन ग्रीव्हजने गोलंदाजी क्रमवारीत 21 स्थानांची झेप घेत 48 वे स्थान मिळवले, तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये आठ स्थानांनी वर चढत नववे स्थान पटकावले.






