आगामी काळातील आयसीसी स्पर्धांचे वेळापत्रक नुकतेच काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकात पाकिस्तानला मोठ्या काळानंतर आयसीसी स्पर्धेच्या आयोजनाची संधी दिली गेली आहे. २०२५ साली होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. अशात भारतासह इतर संघ पाकिस्तानमध्ये या स्पर्धेसाठी जातील की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आयसीसीला अपेक्षा आहे की, सर्व संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जातील.
आयसीसीचे प्रमुख ग्रेन बार्कली यांनी या विषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, येथून आम्ही आता पुढे पाहू इच्छित आहोत. सर्व संघ पाकिस्तान दौरा करतील. आयसीसी क्रिकेट स्पर्धा अनेक वर्षांनंतर पाकिस्तानात परत येत आहे. मागच्या काही आठवड्यांमध्ये जे झाले, ते सोडून हे सर्व कोणत्याच अडथळ्याशिवाय पुढे गेले आहेत.
बार्कली यांनी याविषयी स्पष्ट मत मांडले आहे. ते म्हणाले की, जर आयसीसी गवर्निंग बॉडीला स्पर्धेच्या यशाविषयी विश्वास नसता, तर त्यांनी पाकिस्तानला ही स्पर्धा दिलीच नसती. आम्हाला वाटते की ही एक रोमांचक संधी आहे. त्यांच्यासाठी मोठ्या काळानंतर पहिल्यांदाच जगातील मोठ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी सक्षम होण्याची शक्यता आहे. बार्कली यांनी असेही म्हटले की, स्पर्धेत भारताच्या सहभागावर संभ्रम कायम आहे. कारण, भारतात आतंकवादी हल्ल्यानंतर राजकीय तणावामुळे २०१२ नंतर दोन्ही शेजारी राष्ट्रांमध्ये कोणतीच मालिका खेळली गेली नाही.
यपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष रमीज राजा यांनी भारताच्या या स्पर्धेतील सहभागाविषयी मत व्यक्त केले होते. ते म्हणाले होते की, आयसीसी स्पर्धा असल्यामुळे भारत चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानामध्ये याण्यासाठी नकार देणार नाही. असे असले तरी, बीसीसीआयकडून याबाबत अद्याप कसलीच माहिती दिली गेली नाही. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी मात्र, याविषयी त्यांचे मत यापूर्वीच मांडले आहे. गांगुली म्हटले होते की, दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिकेचे आयोजन करणे आमच्या हातत नाहीय. संबंध राजकारणामुळे खराब झाले आहेत.