आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल) महिला वनडे विश्वचषक २०२२ (ICC Women World Cup 2022) ची सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. ४ मार्चपासून या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. भारतीय महिला संघ ६ मार्चपासून पाकिस्तानविरुद्ध आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. तत्पूर्वी संपूर्ण संघ प्री-टूर्नामेंट फोटोशूट (Pre-Tournament Photoshoot)साठी एकत्र जमला होता. या फोटोशूटदरम्यान भारतीय क्रिकेटपटू भरपूर मजा-मस्ती करताना दिसल्या. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासही दिसत होता. आयसीसी (ICC)ने त्यांचा फोटोशूटदरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आयसीसीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत, भारतीय महिला क्रिकेटपटू हसत- खेळत, डान्स करत फोटोशूटचा आनंद लुटताना दिसत आहेत. भारतीय वनडे संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही व्हिडिओत भांगडा करताना (Harmanpreet Kaur’s Bhangra) दिसत आहे. तिच्या भांगड्यानेच व्हिडिओची सुरुवात होते आहे. भांगडा केल्यानंतर ती म्हणते की, ‘मला फक्त इतकेच येते. मी जिथेही जाते, तिथे इतकेच करते.’
हरमनप्रीतबरोबरच यस्तिका भाटियाही ठुमके लगावताना दिसत आहे. तसेच भारताच्या स्टार सलामीवीर स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) आणि शेफाली वर्मा हसताना खूप क्यूट दिसत आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त व्हिडिओमध्ये झूलन गोस्वामी, कर्णधार मिताली राज, ऋचा घोष आणि इतर भारतीय महिला क्रिकेटपटूही दिसत आहेत.
https://www.instagram.com/reel/Caj8WsKlSqy/?utm_source=ig_web_copy_link
आयसीसीने भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या या क्षणाचा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘काही शानदार डान्सबरोबर हास्याचा एक डोस. भारतीय संघात आनंदाची लहर पसरलेली आहे.’
भारतीय संघाचे विश्वचषकातील वेळापत्रक
दरम्यान या विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेत यजमान न्यूझीलंडसह भारत, वेस्ट इंडिज, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान या ८ देशांचे महिला संघ सहभागी होणार आहेत. या ८ संघात राऊंड-रॉबिन पद्धतीने सामने खेळले जातील. यातून अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
भारतीय संघ पारंपारिक प्रतिद्वंद्वी पाकिस्तानविरुद्ध त्यांच्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करेल. हा सामना ६ मार्च रोजी होईल. त्यानंतर भारतीय संघाला साखळी फेरीमध्ये १० मार्चला न्यूझीलंड, १२ मार्चला वेस्ट इंडिज, १६ मार्चला इंग्लंड, १९ मार्चला ऑस्ट्रेलिया, २२ मार्चला बांगलादेश आणि २७ मार्चला दक्षिण आफ्रिका संघांचा सामना करायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रॉयची जागा भरण्यासाठी गुजरातकडे ‘या’ तीन वादळी फलंदाजांचे पर्याय; सामन्याला कलाटणी देण्यात माहिर