भारतीय क्रिकेट संघाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवला आयसीसी क्रमवारीत यावेळी मोठा फटका बसला आहे. जिथे तो पहिल्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर आला होता. पण आता त्याला तिथूनही खाली यावे लागले आहे. इतकेच नाही तर भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाललाही नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. सूर्या तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याला इंग्लंडच्या फिल सॉल्टने मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला आहे. तर ट्रॅव्हिस हेड अव्वल स्थानी कायम आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी20 मालिकेदरम्यान आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे रँकिंग 881 आहे. आता सूर्यकुमार यादवच्या जागी इंग्लंडच्या फिल सॉल्टने दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. साल्टने नुकतेच शतक झळकावले होते. ज्याचा फायदा त्याला मिळत असल्याचे दिसत आहे. एका स्थानाची झेप घेत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 841 झाले आहे. आतापर्यंत दुसऱ्या क्रमांकावर असलेला सूर्यकुमार यादव आता खाली घसरला आहे. यापूर्वी त्याचे रेटिंग 818 होते. ते आता 803 वर आले आहे. एका स्थानाच्या नुकसानामुळे तो आता तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
पाकिस्तानचा बाबर आझम सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 755 आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 746 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडच्या जोस बटलरला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 726 च्या रेटिंगसह 6 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. बटलर तब्बल चार महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात परतला आहे. त्याच्या दुसऱ्याच सामन्यात त्याने स्फोटक खेळी खेळली. यशस्वी जयस्वालला एका जागेचा नुकसाना झाला आहे. तो आता 720 च्या रेटिंगसह 7 व्या क्रमांकावर पोहचला आहे.
श्रीलंकेच्या पथुम निसांकाने 672 रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आपले स्थान कायम राखण्यात यश मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोश इंग्लिसला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 652 च्या रेटिंगसह 9व्या क्रमांकावर पोहोचला आहे. इतकंच नाही तर वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन दीर्घ कालावधीनंतर टाॅप-10 मध्ये परतला आहे. तो आता 645 च्या रेटिंगसह 10 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
हेही वाचा-
अर्शदीप सिंग इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, या बाबतीत होणार भारताचा ‘नंबर-1’ वेगवान गोलंदाज
एमएस धोनी अडचणीत! चढाव्या लागू शकतात कोर्टाच्या पायऱ्या; प्रकरण जाणून घ्या
विराट किंवा गांगुली नाही, हा खेळाडू आहे भारताचा ऑस्ट्रेलियातील सर्वात यशस्वी कर्णधार, पाहा आकडेवारी