इंग्लंड आणि वेल्स येथे आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. यामध्ये रविवारी (२१ जून) मॅंचेस्टरमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत समोरा-समोर आले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा सामना ६ विकेट्सने गमावला आणि या स्पर्धेतच्या चालू हंगामातील पहिला पराभव नोंदवला. भारत या स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे, मात्र तुम्हाला माहित आहे का की दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत होणे भारतासाठी चांगले आहे. या पराभवामुळे भारतासाठी ट्रॉफी जिंकण्याची संधी निर्माण होऊ शकते. मागील दोन आयसीसी स्पर्धांमध्ये भारतासोबत असे घडले आहे.
२०२५ मध्ये भारतीय महिला संघाने वनडे विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. त्या स्पर्धेतही भारताचा पहिला पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच झाला होता. त्यामध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेत उत्तम सुरूवात केली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ३ विकेट्स राखून पराभूत केले होते. हा पराभव भारतासाठी लकी ठरला, कारण अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले होते.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्येही असेच घडले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताचा या स्पर्धेत पहिला पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला.
२०११ आयसीसी पुरुष विश्वचषकातही भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना पहिल्या चारपैकी तीन सामने जिंकले, तर इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. पाचव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी सामना झाला आणि त्यात भारताला पराभव झाला. तो त्या स्पर्धेतील भारताचा पहिलाच पराभव होता. त्यावर्षीही भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि श्रीलंकेचा पराभव करत २८ वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली होती.
आता पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेत भारताचा पहिला पराभव दक्षिण आफ्रिकेकडून झाला आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाच्या पहिल्या टी२० विश्वचषक जिंकण्याच्या संधींना धक्का बसला आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तान आणि नेदरलॅंड्सचा पराभव करत चांगली सुरूवात केली होती, मात्र आता तिसऱ्या सामन्यात पराभव झाला आहे.






