आयसीसी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोंबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. आगामी विश्वचषकासाठी ८ सप्टेंबरला (बुधवारी) भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारतीय संघात अनेक अनपेक्षित नावे सामील केली गेली आहेत. असे असले तरी, संघात सलामीवीर फलंदाज पृथ्वी शाॅला वगळण्यात आले आहे. त्याला भारताच्या १५ सदस्यांच्या संघात तर नाहीच, पण स्टॅन्डबाय खेळाडूंमध्येही संधी मिळालेली नाही.
केएल राहुलमुळे पृथ्वी शाॅला मिळाली नाही संधी
टी२० विश्वचषकाच्या संघात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची जागा निश्चित मानली जात होती. प्रश्न फक्त त्याच्यासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी दुसऱ्या फलंदाजाचा होता. आता या जागेवर केएल राहुलने बाजी मारलेली दिसत आहे. त्याने संघात स्थान मिळवल्यामुळे पृथ्वी शाॅला टी२० संघात संधी मिळाली नाही.
कर्णधार कोहलीही दिसू शकतो सलामीवीराच्या भूमिकेत
विश्वचषकात आता रोहित आणि राहुल डावाची सुरुवात करताना दिसू शकतात. असे असले तरी गरज पडली तर संघाचा कर्णधार विराट कोहलीही रोहितसोबत डावाची सुरुवात करू शकतो. विराटने याआधी इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील टी२० मालिकेत सलामीवीराची भूमिका पार पाडली होती. मालिकेतील एका सामन्यात त्याने ८० धावांची खेळी केली होती. त्याव्यतिरिक्त संघाच्या स्टॅन्डबाय खेळाडूंमध्ये शार्दुल ठकुरही आहे, जो गरजेच्या वेळी रोहिसोबत डावाची उत्तम सुरुवात करू शकतो. अशा परिस्थितीत पृथ्वीला संघात संधी मिळणे कठीण होते.
पृथ्वी श्रीलंका दौऱ्यात झाला होता गोल्डन डक
पृथ्वी नुकत्याच पार पडलेल्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग होता. तो श्रीलंकेविरुद्ध केवळ एकच सामना खेळू शकला होता, ज्यामध्ये डावाची सुरुवात करायला आल्यावर तो शून्यावर बाद झाला होता. अशात आगामी टी२० विश्वचषकासाठी त्याच्या अपेक्षांना मोठा धक्का लागला होता.
राहुल पृथ्वीपेक्षा जास्त अनुभवी
केएल राहुलने त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४८ सामन्यात १५५७ धावा केल्या असून यात २ शतके आणि १२ अर्धशतके आहेत. या धावा त्याने १४२ च्या स्ट्राइक रेटने केल्या असून त्याची सरासरी ३९.९२ आहे. तर दुसरीकडे पृथ्वी शाॅचा विचार केला तर राहुलच्या तुलनेत केवळ १ आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला आहे. अनुभवाच्या बाबतीत राहुल त्यापेक्षा खूप पुढे आहे.
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
स्टॅन्डबाय : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर
प्रशिक्षक : रवी शास्त्री.
मेंटाॅर : एमएस धोनी.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा, धाकड अष्टपैलू स्टोक्ससह ‘हा’ शिलेदारही बाकावर
टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर, ६ वर्षांनंतर धाकड गोलंदाजाचे पुनरागमन
बिग ब्रेकिंग! इंग्लंड विरुद्ध भारत पाचवा कसोटी सामना रद्द, कारण आहे मोठे