---Advertisement---

T20 WC26: पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा खेळणार का? अखेर कॅप्टन सूर्याने केले स्पष्ट

On: शनिवार, फेब्रुवारी 14, 2026 5:47 PM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये रविवारी (१५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने महत्वाची माहिती दिली आहे.

“पाकिस्तानला अभिषेकने त्यांच्याविरुद्ध खेळावे असे वाटत असेल तर ठीक आहे. तो उद्या खेळणार”, असे सूर्यकुमारने पत्रकार परिषदेत म्हटले आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने अभिषेक लवकर बरा व्हावा आणि खेळावे असे विधान केले होते. सूर्यकुमारने यालाच उत्तर दिले असल्याचे दिसते.

सलमान म्हणाला होता की, “मला आशा आहे की अभिषेक शर्मा लवकर बरा होईल आणि उद्या खेळेल. आम्हाला सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळायचे आहे”.

या स्पर्धेत अभिषेकचे म्हणावे तसे पदार्पण झाले नाही. यूएसएविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर त्याची तब्येत खराब झाली. यामुळे त्याने त्या सामन्यात क्षेत्ररक्षणही केले नव्हते. नंतर त्याला पोटाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्याला दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले गेले. त्यामुळे तो नामिबियाविरुद्धच्या सामन्याला मुकला. आता त्याची तब्येत ठीक असून त्याने संघासोबत सरावही केला आहे.

यावेळी सूर्यकुमारने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करावे की नाही याबाबत विचारले गेले. तो म्हणाला,” २४ तास थांबा. आम्ही चांगलेच क्रिकेट खेळणार आहोत आणि नंतरच निर्णय घेऊ काय करावे ते. सध्यातरी आराम करा आणि झोपा. २४ तासांची प्रतिक्षा करा.”

सलमाननेही त्याला हॅंडशेकबाबत विचारले होते. तो म्हणाला, “हे आम्ही उद्या ठरवू. क्रिकेट चांगल्या भावनेे खेळला पाहिजे. हे माझे स्वत:चे मत आहे. आपल्याला जसे क्रिकेट खेळायचे आहे तसेच खेळले पाहिजे. हॅंडशेकबाबत काय करावे, हे आता त्यांच्यावर अवलंबून आहे.”

दोन्ही कर्णधारांच्या हॅंडशेकबाबत भुमिका पाहून उद्या काय होईल, याचा अंदाज लावणे सध्यातरी कठीण आहे. दोन्ही संघासोबत क्रिकेट चाहतेही या सामन्यासाठी उत्सुक आहेत. दोन्ही संघांनी या स्पर्धेतील त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकले असून या पंरापरागत विरोधी संघांचा हा सामना चुरशीचा होण्याची पक्की खात्री आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---