---Advertisement---

एक भाऊ शिक्षक, दुसरा शिकवतो सुतारकाम! आता टी20 वर्ल्डकपमध्ये वानखेडेवर विक्रमी भागीदारी करत ईटलीला मिळवून दिला विजय

On: शुक्रवार, फेब्रुवारी 13, 2026 11:15 AM
---Advertisement---

ईटलीचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते त्यांच्या देशात असणारे भव्य-दिव्य, सुरेख असे अनेक वास्तुशिल्प आणि फुटबॉल संघांनी जिंकलेले चार विश्वचषक. क्रिकेटमध्ये नवख्या असलेल्या या संघाने उत्तम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मागील महिन्यांमध्ये क्रिकेटच्या नावाजलेल्या संघांमध्येही माहित नसणारा हा देश आता टी२० विश्वचषक स्पर्धेत सामना जिंकत आहे. गुरूवारी (१२ फेब्रुवारी) त्यांनी नेपाळविरुद्ध भारतातील आणि टी२० विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला. ईटलीच्या या ऐतिहासिक विजयामागे दोन सख्ख्या भावांचा हात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांचा साक्षीदार असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमने आणखी एक विक्रम पाहिला. या विश्वचषकात आपला दुसराच सामना खेळणाऱ्या ईटलीने सर्वांना चकित करत नेपाळला १० विकेट्सने पराभूत केले. नेपाळचा हा पराभव आश्चर्यचकित करणारा आहे. कारण त्यांनी या स्पर्धेत याच मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या चिंतेत वाढ केली होती. हा सामना त्यांनी केवळ ४ धावांनी गमावला होता. यावरून ते ईटलीविरुद्ध सहज जिंकतील असे वाटत असताना झाले भलतेच. सोपा विजय तर दूर त्यांनी हा सामनाच गमावला.

या सामन्यात ईटलीने नाणेफेक जिंकत नेपाळला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. बेन मॅनेंटी आण क्रिशन कालुगामेगे यांच्या प्रभावी गोलंदाजीने नेपाळला १९.३ षटकात १२३ धावसंख्येवरच रोकले. लक्ष्याचा पाठलाग करताना ईटलीकडून जस्टिन मॉस्का आणि ऍंथोनी मॉस्का बंधूंनी नेपाळची गोलंदाजी उध्वस्त केली. दोघांनी १२.४ षटकात १२४ धावसंख्येचे लक्ष्य गाठत विक्रम केला.

टी२० विश्वचषकातील असोसिएट संघाने केलेली ही तिसरी सर्वोच्च भागीदारी ठरली. तसेच या स्पर्धेच्या इतिहासात दोन भावांनी मिळून शतकी भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ. ऍंथोनी ३२ चेंडूत ६२ धावा आणि जस्टिन ४४ चेंडूत ६० धावा करत नाबाद राहिले.

या मॉस्का बंधूंनी क्रिकेटचे धडे ईटली नाहीतर ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतून शिकले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचे पूर्वज राहत होते, यामुळे ते क्रिकेटकडे वळाले. तेथे क्रिकेटमध्ये प्रवेश करणे सोपे नव्हते. पुढे ईटलीचे मूळ रहिवाशी असल्याचे महत्वाचे ठरले. कोविडमुळे ईटलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करायला थोडी प्रतिक्षा करावी लागली आणि २०२२मध्ये ते स्वप्न पूर्ण झाले.

क्रिकेटच नाही तर या दोन भावांनी आणखी दुसऱ्या कामामध्ये स्वत:ला व्यस्त ठेवले आहे. क्रिकेटमध्ये कारकिर्दीची अनिश्चितता असल्याने जस्टिन फिजिकल एज्युकेशन टीचर असून ऍंथोनी जुवेनाइल सेंटरमध्ये (बालविकास केंद्र) लहान मुलांना सुतारकाम शिकवतो.

या स्पर्धेत ईटलीचा पुढील सामना १६ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---