---Advertisement---

टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा! शतक हुकले तरी संजू सॅमसनकडून विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड उद्ध्वस्त

On: सोमवार, मार्च 9, 2026 9:46 AM
---Advertisement---

संजू सॅमसनने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा महत्वाची कामगिरी केली. त्याने रविवारी (८ मार्च) न्यूझीलंडविरुद्ध ८९ धावांची खेळी केली. याआधी त्याने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्धही धावांचा पाऊस पाडला होता आणि अर्धशतके केली. त्याच्या या अविश्वसनीय कामगिरीमुळे भारत सलग दुसऱ्यांदा टी२० विश्वविजेता बनला. तो या स्पर्धेचा मालिकावीरही ठरला. त्याला २०२६च्या आवृत्तीत ५ सामने खेळण्याची संधी मिळाली, मात्र त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यामुळे त्याने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. हा विक्रम करताना त्याने भारताचा दिग्गज विराट कोहलीला मागे टाकले आहे.

संजू टी२० विश्वचषक २०२६मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर तो या स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने ५ सामन्यात ८०.२५च्या सरासरीने ३२१ धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १९९.३८ राहिला असून त्याने ३ अर्धशतके केली आहेत. यामुळे तो या स्पर्धेच्या हंगामात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. तसेच ईशान किशनने ९ सामन्यात ३१७ धावा केल्या आहेत. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

संजूने त्याच्या जबरदस्त फलंदाजीने विराटला मागे टाकले आहे. विराटने २०१४च्या टी२० विश्वचषकात ३१९ धावा केल्या होत्या. संजूने २ धाव अधिक करत भारताकडून एका टी२० विश्वचषकाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू होण्याचा मान पटकावला.

टी२० विश्वचषक २०२६च्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानचा साहिबजादा फरहान पहिल्या स्थानावर आहे. त्याने २ शतकासह ६ सामन्यात ३८३ धावा केल्या. या यादीत न्यूझीलंडचा टीम सेफर्ट ३२६ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वोच्च खेळी करण्याचा मानही संजूला जातो. त्याने न्यूझीलंडविरुद्ध ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८९ धावा केल्या. आतापर्यंत हा विक्रम वेस्ट इंडिजच्या मार्लोन सॅम्युअल्स आणि न्यूझीलंडच्या केन विलियमसन यांच्या नावावर होता. सॅम्युअल्सने २०१६मध्ये इंग्लंडविरुद्ध ८५ धावा केल्या होत्या. विलियमसनने २०२१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडविरुद्ध भारताने २५५ धावसंख्या उभारली होती. हा सामना भारताने ९६ धावांनी जिंकला आणि सर्वाधिक असे तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---