आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी२० फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलला टी२० विश्वचषक २०२१ आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. आयसीसीच्या ताज्या टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत राहुलने एका स्थानाची उडी घेतली आहे. त्याचवेळी भारतीय संघाचा माजी टी२० कर्णधार विराट कोहली बऱ्याच काळानंतर पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांनीही वरच्या क्रमांकावर पोहचण्यात यश मिळवले आहे.
टी२० विश्वचषकात अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध सलग तीन अर्धशतके झळकावल्यानंतर राहुलने न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही ६५ धावा केल्या होत्या. अशाप्रकारे केएल राहुलने त्याच्या शेवटच्या ५ डावात ४ अर्धशतके झळकावली होती आणि अखेरीस त्याला याचा फायदा झाला. ताज्या क्रमवारीत तो एका स्थानाने प्रगती करत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली अनेक महिन्यांनंतर टी२० क्रमवारीतील पहिल्या १० फलंदाजांमधून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने विश्रांती घेतली होती, त्यामुळे तो आपल्या क्रमवारीत सुधारणा करू शकला नाही. त्यामुळे तो आठव्या स्थानावरून अकराव्या स्थानावर घसरला आहे.
दुसरीकडे, भारतीय टी२० संघाचा नवा कर्णधार बनलेल्या रोहित शर्मालाही उत्कृष्ट फॉर्मचा फायदा झाला असून, तो दोन स्थानांनी झेप घेत तेराव्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितने विश्वचषकातील शेवटच्या सामन्यांमध्ये चांगली खेळी खेळली होती तसेच त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दोन अर्धशतकांसह १५९ धावा केल्या होत्या.
इतर खेळाडूंमध्ये न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिल पुन्हा एकदा पहिल्या दहामध्ये परतला आहे. गप्टिलने भारताविरुद्धच्या मालिकेत दोन अर्धशतके झळकावली होती. तो आता दहाव्या क्रमांकावर आहे. त्याच्याशिवाय पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानही एका स्थानाने प्रगती करत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अजूनही पहिल्या स्थानावर आहे, तर इंग्लंडचा डेविड मलान दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करम तिसऱ्या स्थानावर आहे.