आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) लॉर्ड्स आणि लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर कारवाई केली आहे. आयसीसीने लॉर्ड्सवरील कसोटी आणि लाहोरमधील वनडे सामन्यांसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांचे मुल्यांकन केले आहे. सामनाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर आयसीसीने त्या खेळपट्ट्यांवर आक्षेप घेतला आहे, अशी माहिती समोर येत आहे.
लॉर्ड्स आणि गद्दाफी स्टेडियमच्या खेळपट्ट्या फलंदाजी आणि गोलंदाजीसाठीही योग्य नव्हत्या. आयसीसीने या दोन्ही खेळपट्ट्यांना असमाधानकारक ठरवले आहे. इतकेच नाही, तर आयसीसीने खेळपट्टी आणि मैदानाच्या देखरेख प्रक्रियेअंतर्गत दोन्ही स्टेडियमना प्रत्येकी एक-एक डिमेरिट पॉइंटही दिला आहे.
नुकतेच लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. दुसरीकडे गद्दाफीमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना खेळला गेला. या दोन्ही सामन्यानंतर सामनाधिकारी आणि कर्णधारांकडून मिळालेल्या प्रतिक्रियेनंतर आयसीसीचे सामनाधिकारी ऍंडी पायक्रॉफ्ट आणि ग्रॅम ला ब्रू यांनी अहवाल सादर केले. दोन्ही स्टेडियमला एक डिमेरिट पॉइंट मिळाला असून जर या खेळपट्ट्यांना आणखी एक डिमेरिट पॉइंट मिळाला तर त्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते.
लॉर्ड्सवर गोलंदाजांची चांदी झाली, कारण तिथे चेंडूच्या उसळीत अनियमितता होती. पायक्रॉफ्टच्या मते, खेळपट्टीवर चेंडूला अधिक सीम मूव्हमेंट मिळत होती. अनेक चेंडू खाली पडत होते. या सामन्यात बॅट आणि बॉल यांच्यात असंतुलन दिसले. संपूर्ण सामन्यात चेंडूची उसळी सतत बदलत होती, ज्यामुळे पहिल्या दिवशी १६ आणि दुसऱ्या दिवशी १७ विकेट्स पडल्या. खेळपट्टीमुळे चेंडू बॅटला लागण्याच्या बाजूने पारडे जड झाले होते.
पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियमच्या खेळपट्टीलाही असमाधानकारक दर्जा मिळाला आहे. कमी धावसंख्येच्या सामन्यात धावा करणे कठीण होते आणि सामनाधिकारी ग्रॅम ला ब्रूय यांच्या अहवालात हाच निर्णायक घटक ठरला. या खेळपट्टीवर फलंदाजांना स्थिरावण्याची अधिक वेळ लागत होता. सामन्याच्या सुरूवातीलाच खेळपट्टीने फिरकीला मदत केली आणि संपूर्ण सामन्यात तशीच स्थिती राहिली. लाहोरमध्ये गोलंदाजांना मदत मिळाली, मात्र चेंडू खूप संथ राहत होता. ती खेळपट्टी वनडे सामन्यासाठी योग्य नव्हती.





