रविवारचा (०८ ऑगस्ट) दिवस भारतीय संघासाठी वाईट ठरला. कारण सततच्या पावसाने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकण्याची चांगली संधी भारताच्या हातून हिरावून घेतली. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पाऊस आणि खराब हवामानामुळे एकाही चेंडूचा खेळ झाला नाही आणि शेवटी दोन्ही संघांना गुणांची समान वाटणी करणे भाग पडले.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातील गुण पद्धती (पॉईंट सिस्टीम) अंतर्गत दोन्ही संघांना प्रत्येकी चार गुण मिळाले आहेत. सध्या भारत चार गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे; तर इंग्लंड समान गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र सामना अनिर्णीत राहिल्यामुळे भारतीय संघाला 8 गुणांच्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. याचा फटका भारतीय संघाला भविष्यात बसू शकतो. मागील कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने सर्वाधिक गुण कमावले होते.
पहिल्या कसोटी सामन्याच्या संभाव्य 450 षटकांपैकी खराब हवामानामुळे जवळपास 250 षटकेच टाकता आली. इंग्लंडने भारताला विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य दिले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाहुण्या भारतीय संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एक विकेट गमावून 52 धावा केल्या. सामन्यात पावसामुळे बरीच षटके वाया गेली, त्यामुळे भारतीय संघाची विजय नोंदवून 12 गुण मिळवण्याची संधी हुकली.
या कसोटीदरम्यान नॉटिंघममध्ये ढगाळ वातावरण होते. ‘सीम’ आणि ‘स्विंगसाठी’ अनुकूल परिस्थिती असूनही लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला रोखणे इंग्लंडसाठी नक्कीच सोपे नव्हते. सलामीवीर लोकेश राहुलने भारताच्या पहिल्या डावात 84 धावा करून दाखवले होते की, या खेळपट्टीवर धावा करणे आव्हानात्मक असू शकते. पण खेळपट्टी अशी नव्हती की त्यावर फलंदाजीच करता येत नाही.
पहिल्या कसोटीत भारतासाठी बऱ्याच बाबी सकारात्मक राहिल्या. 2007 आणि 2014 मालिका वगळता भारताने अलीकडच्या काळात इंग्लंडमधील पहिली कसोटी नेहमीच गमावली आहे आणि त्या दृष्टीने हा निकाल चांगला म्हणता येईल.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नव्या नियमानुसार एक कसोटी सामना जिंकल्यानंतर 12 गुण, अनिर्णीत राहिली तर दोन्ही संघांना 4-4 गुण आणि सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 6-6 गुण मिळणार आहेत. यापूर्वीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पर्वात मालिकेच्या आधारावर गुण मिळत होते. एका मालिकेमध्ये जास्तीत जास्त 120 गुण दिले जात असत.
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहविषयी विचारलेला प्रश्न ऐकून चकित झाला राहुल; म्हणाला, ‘सर, मला माहिती नाही’
भारत विजयपथावर असताना पहिली कसोटी ड्रॉ; कोहली म्हणाला, ‘अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की..’
इंग्लंडविरुद्ध ९ विकेट्स घेऊनही बुमराहला का मिळाला सामनावीर पुरस्कार? घ्या जाणून