आयसीसीने बुधवारी (२९ डिसेंबर) खेळाडूंची सुधारित क्रमवारी (icc player ranking) घोषित केली. भारतीय संघासाठी ही नवीन सुधारित क्रमवारी समाधानकारक आहे. कसोटी क्रमवारीत भारताचा रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) अष्टपैलू आणि गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तसेच रवींद्र जडेजा (ravindra jadeja) कसोटी अष्टपैलूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. तसेच कसोटी फलंदाजांमध्ये रोहित शर्मा (rohit sharma) आणि विराट कोहली (virat kohli) यांनी अनुक्रमे त्यांचे पाचवे आणि सातवे स्थान कायम ठेवले आहे.
कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅब्युशेन पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिकेत अप्रतिम प्रदर्शन केले आणि पहिले स्थान कायम राखले. त्यानंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार जो रूट आहे, तसेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विलियम्सन तिसऱ्या क्रमांकावर आल्यामुळे स्टीव स्मिथ एका क्रमांकाने खाली घसरून चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याव्यतिरिक्त रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, दिमुथ करुणारत्ने, बाबर आझम आणि ट्रेविस हेड हे फलंदाज या यादीत पहिल्या १० मध्ये सामील आहेत.
कसोटी गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भारताचा फिरकीपटू अश्विन दुसऱ्या आणि त्यापाठोपाठ पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा टिम साउदी चौथ्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने मोठी झेप घेतली आहे. अँडरसनने या यादीत तीन क्रमांकाने आघाडी घेत पाचवा क्रमांक पटकावला आहे. ऍशेस मालिकेतील मेलबर्न कसोटी सामन्यातून ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करणाऱ्या स्कॉट बोलँडने सात धावा देऊन सहा विकेट्स घेतल्या होत्या. यासाठी त्याला २७१ गुण मिळाले आणि कसोटी गोलंदाजांमध्ये त्याने ७४ वे स्थान मिळवले.
कसोटी अष्टपैलूंच्या यादीत वेस्ट इंजीडजा जेसन होल्डर पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे भारताचे रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा आहेत. त्यानंतर या यादीत शाकीब अल हसन, मिशेल मार्श आणि बेन स्टोक्स यांचा क्रमांक आहे.
कसोटी संघांच्या क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर काबिज आहे. त्यानंतर न्यूझीलंड दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘ये कव्हर ड्राईव्ह तुम्हे बर्बाद कर देगा विराट..’, कडवट शब्दात नेटकरी करतायेत ट्रोल
‘नवीन एक्सप्रेस’ची ऐतिहासिक कामगिरी! दबंग दिल्लीकडून गतविजेता बंगाल नामोहरम
‘या’ कारणाने रद्द करण्यात आला आशिया चषकातील महत्त्वपूर्ण सामना; क्षणात बदलली उपांत्य फेरीची समीकरणे
व्हिडिओ पाहा –