इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल अर्थात आयसीसी मध्ये सगळे काही आलबेल नसल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. अंतर्गत घडामोडींमुळे आयसीसी मधील वातावरण गढूळ झाले आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार आयसीसीने आपले मुख्य कार्यकारी अधिकारी मनु सहानी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
आयसीसीने अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र काही रिपोर्ट्सनुसार ही बाब खरी असल्याचा दावा केला गेला आहे. भारतीय असलेल्या मनु सहानी यांना लवकरच राजीनामा द्यावा लागू शकतो, असेही या रिपोर्ट्स मध्ये म्हंटले आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या रिपोर्टनुसार हा निर्णय ऑडिट कंपनी प्राईस वॉटरहाऊस कूपर्ससह साहनी यांची काम करण्याची पद्धत पाहून घेण्यात आला असल्याचे समजते. मनु साहनी यांनी २०१९ साली डेव्ह रिचर्डसन यांच्याकडून मुख्य कार्यकारी पदाचा कार्यभार स्विकारला होता. मात्र आता रिपोर्टनुसार साहनी यांच्यावर स्टाफसह गैरव्यवहार करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप यापूर्वीही झाले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुबई येथील आयसीसीच्या कार्यालयातील ९० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी साहनी यांच्या विरोधात साक्ष दिली आहे. ५६ वर्षीय साहनी हे गेले काही दिवस कामावर येत नव्हते आणि मंगळवारपासून त्यांना रजेवर जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यांचा कार्यकाल पूर्ण व्हायला अद्याप एका वर्षाचा अवधी बाकी आहे.
दरम्यान, २०१९ च्या विश्वचषकानंतर मनु साहनी यांनी आयसीसीच्या मुख्य कार्यकारी पदाचा अधिभार स्विकारला होता. एप्रिल २०१९ मध्येच त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती. मात्र विश्वचषक सुरु असल्याने जुलै २०१९ पर्यंत डेव्ह रिचर्डसन यांनीच हे पद सांभाळले होते. त्यांनतर या पदाचे कामकाज पाहणाऱ्या मनु साहनी यांच्यावर आता मात्र हे गंभीर आरोप लावण्यात आले असून भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. या प्रकरणी आता आयसीसी काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
कसोटीत दोन्ही डावात शतक करणारे ६ भारतीय दिग्गज फलंदाज
रोहित शर्माचा पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झालेल्या सुर्यकुमार आणि इशान किशनला खास सल्ला; म्हणाला