---Advertisement---

सेमीफायनलच्या एक दिवस आधीच बिघडलेली हरमनची तब्येत; कांगारूंचा धाडसाने सामना करत जिंकली सर्वांची मने

On: शुक्रवार, फेब्रुवारी 24, 2023 10:07 AM
Skipper-Harmanpreet-Kaur
---Advertisement---

महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारतीय संघाचा प्रवास उपांत्य सामन्यात पराभूत होताच संपुष्टात आला. पहिला उपांत्य सामन्यात गुरुवारी (दि. 23 फेब्रुवारी) केपटाऊन येथे भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने 5 धावांनी जिंकत अंतिम सामन्यात धडक दिली, तर भारतीय संघ स्पर्धेबाहेर पडला. अशाप्रकारे पुन्हा एकदा भारतीय संघाचे टी20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. भारत सामना पराभूत झाला असला, तरीही कर्णधार हरमनप्रीत कौर हिने सर्वांची मने जिंकली. कशी ती, जाणून घेऊयात…

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 172 धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 8 विकेट्स गमावत 167 धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 5 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे, मागील 2020च्या हंगामातही ऑस्ट्रेलियाने त्यांच्या देशात अंतिम सामन्यात भारताला पराभूत करत विश्वचषक जिंकला होता.

हरमनप्रीत कौरचे समर्पण
हरमनप्रीत कौरने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खूपच धाडसी खेळी साकारली. खरं तर, सामन्याच्या एक दिवस आधी ती खूपच आजारी होती. तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला केपटाऊनच्या रुग्णालयातही जावे लागले होते. गुरुवारी सामन्याच्या दिवशीही तिच्या खेळण्यावर संशय होता, परंतु तिने औषध घेऊन तब्येतीत सुधारणा केली आणि मैदानात उतरली.

हरमनप्रीतने नाणेफेकीवेळी तिच्या तब्येतीबद्दल माहिती दिली होती. तिने सांगितले की, “हो, माझी तब्येत सामन्याच्या एक दिवस आधी ठीक नव्हती. मला दवाखान्यात जावे लागले होते. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे घेतली आणि आता खेळण्यासाठी चांगले वाटत आहे. आमच्यासाठी हा मोठा सामना आहे आणि या सामन्यात मला बाहेर बसायचे नव्हते.”

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने शानदार झुंज दिली. भारताने 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीला 3 विकेट्स गमावले होते. त्यानंतर हरमनप्रीतने शानदार अर्धशतक झळकावले. तसेच, वेगाने धावा करत सामन्याची दिशा बदलली. तिने यावेळी 34 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 52 धावांचे योगदान दिले. मात्र, ती यावेळी दुर्दैवीरीत्या धावबाद झाली. (icc womens t20 semifinal india captain harmanpreet kaur not well before match takes medicine hits fifty against australia)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्रू लपवण्यासाठी हरमनने लावला चष्मा, पण चेहऱ्यावर दिसल्या वेदना; म्हणाली, ‘माझ्या देशाने मला रडताना…’
‘या’ पाच कारणांनी भंगले टीम इंडियाचे स्वप्न! विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची पाटी कोरीच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---