आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) पहिल्या 2 सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश महिला संघाविरुद्ध विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघ उद्या (27 फेब्रुवारी) मेलबर्न (Melbourne) येथे न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध आपला तिसरा सामना खेळणार आहे.
या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ हॅट्रिक पूर्ण करण्याचा आणि उपांत्य फेरीत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. उपांत्य फेरीतील सामना हा ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये अव्वल असणाऱ्या 2 संघांदरम्यान होणार आहे. भारत सध्या 5 संघांच्या ग्रुप ए मध्ये 2 सामन्यात 4 गुण मिळवत अव्वल स्थानावर आहे.
पहिल्या 2 सामन्यात भारताने उत्तम फलंदाजी प्रदर्शन केले आहे. वरच्या फळीतील भारताची युवा फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) दोन्ही सामन्यात उत्कृष्ट खेळी केली आहे. तिने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 29 धावा केल्या. तर, बांगलादेशविरुद्ध 17 चेंडूत सर्वाधिक 39 धावा केल्या आहेत.
शिवाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत जेमिमाह रोड्रिगेजने दोन्ही सामन्यात अनुक्रमे 26 आणि 34 धावांची उपयुक्त खेळी केली. मात्र, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरला 2 आकडी धावसंख्या देखील पार करता आली नाही. त्यामुळे, पुढील सामन्यात हरमनप्रीतकडून मोठ्या धावा करण्याची अपेक्षा आहे.
भारताची अनुभवी फलंदाज स्म्रीती मंधना आजारी असल्याने बांगलादेशविरुद्ध खेऴू शकली नाही. मात्र, पुढील सामन्यात ती खेळण्याची शक्यता असल्याने स्म्रीतीकडूनही अधिक धावा करण्याची आशा आहे.
मधल्या फळीतील फलंदाज दीप्ती शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना नाबाद सर्वाधिक 49 धावांचे योगदान दिले होते. तर, बांगलादेशविरुद्ध खेळताना वेदा कृष्णामूर्थीने 11 चेंडूत नाबाद 20 धावांची खेळी केली होती.
भारताकडून पुनम यादवने शानदार गोलंदाजी करत दोन्ही संघाला मोठे धक्के दिले होते. यावेळी तिने प्रत्येक सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तिच्या व्यतिरिक्त भारताकडून शिखा पांडेनेही चांगली गोलंदाजी करत एकूण 5 विकेट्स घेतल्या होत्या.
असे असतानाही न्यूझीलंडची भारताविरुद्धची कामगिरी चांगली आहे. 1 वर्षापुर्वी 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 3-0ने पराभव केला होता. मात्र, 2018मध्ये न्यूझीलंडविरुद्ध जिंकलेल्या टी20 विश्वचषक सामन्यातून भारताने प्रेरणा घ्यायला हवी.
आयसीसी महिला टी20 विश्वचषकासाठी असा आहे भारतीय संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधना, जेमिमाह रोड्रिगेज, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, पूनम यादव, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड़, ऋचा घोष, वेदा कृष्णामूर्थी, शिखा पांडे, अरुंधति रेड्डी, पूजा वस्त्रकार
आयसीसी महिला टी20 विश्वचषकासाठी असा आहे न्यूझीलंड संघ :
सोफी डिवाइन (कर्णधार), रोजमेरी मेयर, अमेलिया केर, सूजी बेट्स, लॉरेन डाउन, मैडी ग्रीन, होली हडलस्टन, हेले जेन्सेन, लीग कास्पेरेक, जेस केर, केटी मार्टिन (यष्टीरक्षक), केटी पर्किन्स, अन्ना पीटरसन, रेचेल प्रीस्ट , ली ताहुहु