आयसीसी महिला टी २० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्याचे संघ निश्चित झाले आहे. हा सामना या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या दोन संघांमध्ये होणार आहे. लॉर्ड्सवर ५ जुलैला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे.
पहिल्या उपांत्य सामन्यात सहा वेळेच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंड संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून विजेतेपदाच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले. आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकावर आपले नाव कोरण्यासाठी सामना होणार असून आयसीसीने यंदा बक्षीस रकमेत लक्षणीय वाढ केली आहे.
महिला क्रिकेटला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ केली आहे. विजेत्या संघाचा ट्रॉफीसोबत २.३४ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे २२ कोटी रुपये) इतकी बक्षीस रकम मिळेल. तसेच पराभव झालेल्या संघालाही १.१७ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ११ कोटी रुपये) इतके बक्षीस मिळणार आहे. २०२४ च्या तुलनेत आयसीसीने बक्षीस रकमेत १० टक्क्यांनी वाढ केली आहे.
विजेतेपदाचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. त्याच्या अर्ध्या तासाआधी नाणेफेक होईल. दोन्ही संघाचा सध्याचा फॉर्म पाहता चाहत्यांना लॉर्ड्सवर एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. (ICC Women’s T20 world Cup 2026 prize money)
महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा आयसीसी टी २० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची कामगिरी ऑस्ट्रेलियाने केली आहे. त्यांनी आता तब्बल ८ वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यानंतर इंग्लंड संघ असून त्यांनी ५ वेळा ही कामगिरी केली आहे. न्यूझीलंड ३ वेळा आणि दक्षिण आफ्रिका दोन वेळा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाने सहा वेळा तर इंग्लंडने एकदा टी २० विश्वचषक जिंकला आहे.






