नेदरलँड्स संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 28व्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय साकारला. नेदरलँड्सने 87 धावांनी शानदार विजय मिळवला. हा त्यांचा स्पर्धेतील दुसरा विजय होता. या विजयानंतर वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू इयान बिशप यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नेदरलँड्सच्या या विजयाला तुम्ही उलटफेर म्हणू शकत नाही. कारण, त्यांनी जबरदस्त खेळ दाखवला आहे.
सामन्यात काय घडलं?
नेदरलँड्स संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात सर्व विकेट्स गमावत 229 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाचा डाव 42.2 षटकात 142 धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे नेदरलँड्सने हा सामना 87 धावांनी जिंकला. नेदरलँड्सकडून कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने सर्वाधिक 68 धावांची महत्त्वाची खेळी केली. तसेच, गोलंदाजीत पॉल व्हॅन मीकेरेन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. हा बांगलादेशचा 6 सामन्यात पाचवा पराभव ठरला. तसेच, ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले. त्यांनी फक्त अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला होता. दुसरीकडे, नेदरलँड्सचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला होता.
इयान बिशप काय म्हणाले?
नेदरलँड्सच्या विजयानंतर इयान बिशप यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून पोस्ट केली. त्यांनी म्हटले की, वेस्ट इंडिज संघातही स्कॉटसारखे लीडर असते, जे स्टार खेळाडूंशिवाय संघाला विजय मिळवून देऊ शकले असते. बिशप म्हणाले, “नेदरलँड्स क्रिकेट आणि स्कॉट एडवर्ड्स यांच्या प्रशंसेसाठी ही पोस्ट आहे. आमच्याकडेही स्कॉट एडवर्ड्ससारखा नेतृत्वकर्ता असता, ज्याने कमी संसाधनांमध्ये इतकी चांगली कामगिरी केली आहे. संघात कोणीच स्टार खेळाडू नाहीये, पण संघ स्मार्ट आणि कठोर मेहनत घेतो. तुम्ही याला उलटफेर म्हणू शकत नाहीत. संघ या विजयाचा हक्कदार आहे.”
Appreciation post for Scott Edwards and Netherlands Cricket. I wish we had more leaders like him who do much with little. No global superstars, but they work smart and hard. These are no longer upsets. They are deserved victories.
— Ian Raphael Bishop (@irbishi) October 28, 2023
खरं तर, वेस्ट इंडिज संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे, पण तरीही ते विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी क्वालिफाय करू शकले नाहीत. नेदरलँड्स संघानेच वेस्ट इंडिज संघाला पराभूत करत विश्वचषक 2023 स्पर्धेत एन्ट्री केली होती. (icc world cup 2023 west indies former cricketer ian bishop reacts after netherlands 87 run win over bangladesh)
हेही वाचा-
“रोहित स्वतःसाठी खेळला असता तर…”, गंभीरच्या त्या विधानाने उंचावल्या भुवया
झहीर टॉपला असलेल्या यादीत विराट पाचव्या क्रमांकावर, नकोशा विक्रमात सचिनला टाकले मागे