आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीत सोमवारी (दि. 26 जून) रोमांचक सामना पाहायला मिळाला. क्वालिफायर फेरीतील 18वा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध नेदरलँड संघात पार पडला. या सामन्यात नेदरलँडने मोठा उलटफेर करत वेस्ट इंडिज संघाला पराभवाचं पाणी पाजलं. वेस्ट इंडिज संघ 373 धावांचा बचाव करू शकला नाही आणि सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर उभय संघात सुपर ओव्हर झाली. यादरम्यान नेदरलँडचा फलंदाज लोगन व्हॅन बीक याने जेसन होल्डरची चांगलीच धुलाई केली. त्याने यावेळी 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 30 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बलाढ्य वेस्ट इंडिज संघ फक्त 8 धावाच करू शकला.
अखेरच्या षटकाचा रोमांच
खरं तर, नेदरलँड (Netherlands) संघाला विजयासाठी अखेरच्या षटकात 9 धावांची गरज होती. वेस्ट इंडिज (West Indies) संघाकडून हे षटक अल्झारी जोसेफ टाकत होता. जोसेफच्या पहिल्या चेंडूवर लोगन व्हॅन बीक (Logan Van Beek) याने चौकार मारला. या चौकारासह नेदरलँडच्या आशा वाढल्या होत्या. अखेरच्या 5 चेंडूत 5 धावांची गरज होती. मात्र, जोसेफने पुढील पाचही चेंडूत दोन विकेट्स घेत फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
सुपर ओव्हरमध्ये लोगन व्हॅन बीकची धमाल
सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिज संघाकडून जेसन होल्डर (Jason Holder) गोलंदाजी करत होता. नेदरलँडकडून पुन्हा एकदा लोगन स्ट्राईकवर होता. त्याने यावेळी धमाल केली. होल्डरने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर लोगनने चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा एक षटकार मारला. अशाप्रकारे 4 चेंडूत 20 धावा झाल्या होत्या. त्यानंतर षटकातील पाचव्या चेंडूवरही लोगनने षटकार मारला आणि अखेरचा चेंडू चौकारासाठी पाठवत सुपर ओव्हरचा शेवट केला.
An encounter to remember!
What a performance from Netherlands ???? #CWC23 | #WIvNED pic.twitter.com/KWXRHhiUKF
— ICC (@ICC) June 26, 2023
गोलंदाजही चमकले
या षटकातून एकूण 30 धावा आल्या. आता वेस्ट इंडिजला विजयासाठी 31 धावांची गरज होती. त्यांच्याकडून जॉनसन चार्ल्स याने षटकार मारत चांगली सुरुवात केली. मात्र, बॅटमधून धमाल करणाऱ्या लोगन याने पुढील दोन चेंडूंवर फक्त दोन धावा खर्च केल्या. चौथ्या षटकात चार्ल्सने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली. तसेच, पुढच्या चेंडूवर होल्डरही तंबूत परतला. अशाप्रकारे वनडे क्रिकेट इतिहासातील तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड संघाने बाजी मारली.
वेस्ट इंडिज संघाने उभारलेला 374 धावांचा डोंगर
तत्पूर्वी वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावत 374 धावा केल्या होत्या. यावेळी संघाकडून निकोलस पूरन याने शानदार फलंदाजी करताना 65 चेंडूत नाबाद 104 धावा करत शतक झळकावले होते. यामध्ये 6 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. वेस्ट इंडिजच्या या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड संघाकडून तेजा निदामानुरू याने शानदार फलंदाजी करत 76 चेंडूत 111 धावा केल्या. यामध्ये 3 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. तसेच, लोगन याने अखेरच्या षटकांमध्ये 14 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 28 धावा कुटल्या. यामुळे नेदरलँड संघानेही 50 षटकात 9 विकेट्स गमावत 374 धावा केल्या होत्या. मात्र, सुपर ओव्हरमध्ये धमाल कामगिरी करत नेदरलँड विजय मिळवण्यात यशस्वी झाला. (icc world cup qualifiers 2023 netherlands beats west indies in super over)
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ‘या’ 12 शहरात खेळले जाणार वनडे विश्वचषक 2023चे सर्व सामने, एका क्लिकवर घ्या जाणून
केविन-युवराजमधील भांडणानंतर इंग्लंडच्या दिग्गजाने मारला होता अल्टी-पल्टी शॉट, वाचा तो रोमांचक किस्सा