शुक्रवार रोजी (०३ डिसेंबर) दुसऱ्या कसोटीने वेस्ट इंडिजच्या श्रीलंका दौऱ्याचे समापन झाले. गॅले स्टेडियमवरील दुसऱ्या आणि अंतिम कसोटीच्या शेवटच्या दिवशी श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर १६४ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. यासह यजमान श्रीलंका संघाने पाहुण्या वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेत २-० ने क्लिन स्वीप केले आहे. या मालिकेनंतर आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत.
विजेत्या श्रीलंका संघाने गुणतालिकेतील आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत २ सामने खेळताना दोन्हीही सामन्यात विजय मिळवत त्यांनी २४ गुणांसह गुणतालिकेतील आपले अव्वलस्थान राखून ठेवले आहे. त्यांच्या खात्यात १०० टक्के गुण असल्याने ते प्रथमस्थानी आहेत.
श्रीलंकेच्या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घसरला आहे. तर पाकिस्तान संघ टॉप-२ मध्ये आहे. पाकिस्तानचे गुणही श्रीलंकेच्या बरोबरीने २४ इतके आहेत. परंतु टक्केवारीत ते श्रीलंकेच्या मागे असल्याने त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. पाकिस्तानचे टक्केवारी गुण ६६.६६ इतके आहेत.
तिसऱ्या स्थानावर घसरलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ५ सामने खेळले आहेत. यामध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसह सध्या न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कानपूर कसोटी सामन्याचाही समावेश आहे. हा सामना अनिर्णीत राहिल्याने भारतीय संघाची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी जाण्याची संधी हुकली आहे. ५ पैकी २ सामने जिंकत आणि २ सामने अनिर्णीत ठेवत या संघाच्या खात्यात ३० गुण जमा आहेत. परंतु टक्केवारीमुळे (५० टक्के) भारतीय संघ तिसऱ्या स्थानी आहे.
याखेरीज श्रीलंकेच्या हातून पराभूत झालेल्या वेस्ट इंडिजचा खालून दुसऱ्या स्थानावर ताबा आहे. केवळ १ सामना जिंकत आणि ३ सामने गमावत हा संघ या स्थानावर आला आहे.
Sri Lanka sit comfortably on 🔝
The ICC World Test Championship points table after the second #SLvWI Test 👇 pic.twitter.com/8uGXBVTzin
— ICC (@ICC) December 3, 2021
दरम्यान श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामधील गॅले कसोटीविषयी बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ २०४ धावांवरच सर्वबाद झाला होता. या डावात श्रीलंकेकडून सलामीवीर पथुम निशांकाने सर्वाधिक ७३ धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडिजकडून गोलंदाज वीरसामी परमौलने विकेट्सचा पंचक घेतला होता.
प्रत्युत्तरात कर्णधार क्रेग ब्रेथवेटच्या ७२ धावांच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजचा संघ २५३ धावांपर्यंत मजल मारू शकला होता. परंतु दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या धनंजया डी सिल्वाचे दीडशतक आणि पथुम निशांकाचे अर्धशतक वेस्ट इंडिजला पुरून उरणारे ठरले. श्रीलंकेच्या २९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघाची गाडी केवळ १३२ धावांपर्यंत पोहोचली. परिणामी संघाला १५० पेक्षा जास्त धावांच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
हॉकीसाठी शाळा सोडून केली कठोर मेहनत, आता बनला भारताच्या विजयाचा शिल्पकार
भारतीय क्रिकेटला बदनाम करणारे माईक डेनिस: ज्यांनी केलेली अर्धी टीम इंडिया बॅन
INDvsNZ, 2nd Test, Live: दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच ‘मुंबईकरा’चे भारताला दोन जबदरस्त धक्के