---Advertisement---

आइसलंड क्रिकेटने घेतली ऑस्ट्रेलियाची मजा! पाहा आता काय पोस्ट केले ते

On: बुधवार, फेब्रुवारी 18, 2026 11:01 AM
---Advertisement---

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये माजी विश्वविजेता ऑस्ट्रेलिया बाहेर झाला, याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. क्रिकेट विश्वचषकाची स्पर्धा म्हटली की ऑस्ट्रेलिया शेवटच्या फेरीत किंवा उपांत्य फेरीत पोहोचतो, मग ती कोणतीही असो-टी२०, कसोटी किंवा वनडे. यंदा मात्र ते १७ वर्षानंतर टी२० विश्वचषकाच्या साखळी फेरीतून बाहेर झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या सुपर-८मध्ये जाण्याच्या काही संधी झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड सामन्यापर्यंत होत्या. हा सामना मंगळवारी (१७ फेब्रुवारी) पल्लेकेलेमध्ये खेळला जाणार होता, मात्र पावसामुळे तो रद्द झाला आणि ऑस्ट्रेलिया बाहेर झाला. तसेच झिम्बाब्वेने सुपर-८मध्ये प्रवेश केला.

या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी म्हणावी तशी खास झाली नाही. त्यांनी साखळी फेरीत ३ सामने खेळले असता केवळ एकच सामना त्यांना जिंकता आला. उर्वरित दोन सामन्यांमध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वेनी त्यांचा पराभव केला.

यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने घेतलेला एक निर्णय अधिक चर्चेत आला होता. त्यांनी दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडच्या जागी अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथला संघात घेतले होते. त्यानंतर त्याला प्लेईंग इलेवनमध्ये खेळवले देखील नाही. स्मिथने २०२५-२६च्या बिग बॅश लीगमध्ये खेळताना ६ सामन्यात २९९ धावा केल्या होत्या.

आइसलंड क्रिकेट नेहमी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर विचित्र आणि मजेशीर पोस्ट करत असतात. आता त्यांनी स्मिथबाबत ‘एक्स’च्या अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

या पोस्टमध्ये आइसलंड क्रिकेटने म्हटले, ‘टी२० विश्वचषकात स्मिथसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एयरपोर्टची ड्युटी फ्री शॉपिंग राहिली. आम्ही त्याला चांगली वागणूक दिली असती, त्याची मूर्ती बनवली असती आणि कायमचे मोफत कॉड (मासे) दिले असते. कधी-कधी तुम्ही सर्वात उत्तम खेळाडूला विसरुन जाता.’

श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेेलियाचा कर्णधार मिचेल मार्श हा खूपच दु:खी दिसला. तसेच संघाच्या ड्रेसिंग रुमचेही तसेच वातावरण होते. संघ लवकर बाहेर झाल्याने संघाच्या निवडीवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा शेवटचा साखळी सामना बाकी आहे, जो ओमानविरुद्ध २० फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---