आयपीएल 2024 चा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. मात्र या मोसमात 5 वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मुंबईच्या खराब कामगिरीचा अंदाज यावरून लावता येतो की, हा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. कागदावर मुंबईची टीम पाहता त्यांची अवस्था इतकी वाईट होईल, असा विचार कोणीच केला नव्हता. संघाच्या या खराब कामगिरीचं मुख्य कारण त्यांची अंतर्गत परिस्थिती असल्याचं क्रिकेट तज्ज्ञांचं मत आहे.
आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी मुंबईनं हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समधून ट्रेड केलं आणि त्याला कर्णधार बनवलं. मात्र संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना ही गोष्ट आवडली नाही. इतकेच नाही तर अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनीही फ्रँचायझीच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्माही निराश झाला आहे. त्यामुळे त्याच्यात आणि फ्रँचायझीमध्ये मतभेद सुरू असल्याचं मानलं जात आहे. पुढील वर्षी मेगा लिलाव होणार आहे. लिलावात गतवेळीप्रमाणेच नियम कायम राहिल्यास, सर्व संघांना किमान 3 खेळाडूंना रिटेन करता येऊ शकतं. अशा स्थितीत मुंबईचा संघ हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना कायम ठेवू शकतो.
फ्रँचायझीसोबत सुरू असलेल्या मतभेदादरम्यान, रोहित शर्माला पुढील वर्षी मुंबई इंडियन्सच्या संघात संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे जर 2025 मध्ये मुंबईनं रोहितला रिटेन केलं नाही, तर तो पंजाब किंग्ज किंवा लखनऊ सुपर जायंट्सच्या ताफ्यात सामील होऊ शकतो.
आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पंजाबची कमान शिखर धवनच्या हाती होती. त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी फारशी विशेष राहिली नाही. धवन दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर सॅम करननं पदभार स्वीकारला. मात्र त्याच्या नेतृत्वातही संघाचं नशीब पालटलं नाही. पंजाबकडे चांगले खेळाडू आहेत, मात्र त्यांच्यापैकी कोणाकडेही नेतृत्व करण्याची क्षमता दिसत नाही. अशा स्थितीत पुढील हंगामात प्रीति झिंटाची टीम रोहित शर्माचा समावेश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे.
लखनऊची अवस्थाही पंजाब प्रमाणेच आहे. चालू हंगामात संघ मालक संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यातील वादाच्या बातम्या समोर आल्या आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर गोयंका राहुलच्या कर्णधार म्हणून कामगिरीवर फारच नाराज आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्माकडे पुढील हंगामात लखनऊच्या संघात सामील होण्याचा देखील पर्याय आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जोस बटलर तर गेला, आता सलामीवीर म्हणून कोण खेळणार? राजस्थान रॉयल्सकडे आहेत ‘हे’ 3 पर्याय
आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्याला बसणार पावसाचा फटका! 18 मे रोजी बंगळुरूचं हवामान कसं असेल? जाणून घ्या
“जर मी आरसीबीविरुद्ध खेळलो असतो तर…”, रिषभ पंतनं लगावला बीसीसीआयला टोला; म्हणाला…