भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला आहे. हा कार्यकाळ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसोबतच संपला आहे. मात्र, अलीकडेच अशी बातमी आली की, द्रविडला मुदतवाढ मिळाली आहे आणि तो आयसीसी टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेपर्यंत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. मात्र, जेव्हा द्रविडला विचारणा केली, तेव्हा त्याने म्हटले की, त्याने अद्याप करारावर स्वाक्षरी केली नाहीये. जेव्हा होईल, तेव्हा तो प्रतिक्रिया देईल.
अशात राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्याविषयी गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले की, भारत आणि पाकिस्तान असे दोन देश आहेत, ज्यांचे मुख्य प्रशिक्षक त्यांच्याच देशाचे असले पाहिजेत. विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेनंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद व्हीव्हीएस लक्ष्मण याच्याकडे आहे.
स्पोर्ट्सकीडा या वेबसाईटशी बोलताना गंभीर आणि पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम यांच्यात चर्चा सुरू होती. यावेळी गंभीर म्हणाला की, “भारत आणि पाकिस्तानसारख्या देशात मुख्य प्रशिक्षक त्यांच्याच देशाचे असले पाहिजेत. जेव्हा मी असे म्हणत आहे, तर लोक म्हणतात, पण भारताने 2011 विश्वचषक गॅरी कर्स्टन यांच्या कार्यकाळात जिंकला होता, पण निळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या जर्सीचे जे महत्त्व राहुल द्रविडला समजेल, ते कोणताही परदेशी प्रशिक्षक समजू शकणार नाही. असेच पाकिस्तानबद्दलही आहे. त्यांच्या हिरव्या किंवा पांढऱ्या जर्सीचे जे महत्त्व, पाकिस्तानी प्रशिक्षकाला समजेल, ते परदेशी प्रशिक्षकाला समजणार नाही. आमचा क्रिकेटचा खूप शानदार इतिहास आहे. आम्ही अशा देशात नाहीत, जे 10-15 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहेत. आमच्याकडे असे खेळाडू आहेत, ज्यांनी विश्वचषक जिंकून दिला आहे.”
‘द्रविडला मुदतवाढ द्यायची असेल तर द्या नाहीतर…’
पुढे बोलताना गंभीर म्हणाला, “खेळात भावना खूप महत्त्वाच्या असतात. व्यावसायिक आणि आर्थिक अँगलही महत्त्वाचा आहे, पण खेळात सर्वात महत्त्वाच्या भावना असतात. त्यांना आठवते की, जेव्हा ते ही जर्सी घालत होते, तेव्हा त्यासाठी त्यांनी रक्त, घाम आणि अश्रू गाळले होते. जर राहुल द्रविडला एक्सटेन्शन हवे असेल, तर ते त्याला दिले जावे, नाहीतर कोणत्याही भारतीयाला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवले जावे.”
वसीम अक्रम यानेही गंभीरच्या या वक्तव्यावर सहमती दर्शवली. तसेच, त्याची प्रशंसा करत म्हटले की, “विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारतीय संघाचे कोचिंग स्टाफ भारतीय होते.”
खरं तर, भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली होती. भारताने साखळी फेरीतील 9 आणि उपांत्य असे एकूण सलग 10 सामने जिंकले होते. मात्र, बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताला अंतिम सामन्यात 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे भारताचे 12 वर्षांनंतर आयसीसी वनडे विश्वचषक किताब जिंकण्याचे स्वप्न तुटले. (if rahul dravid wants an extension then give it otherwise what did former cricketer gautam gambhir say read)
हेही वाचा-
Abu Dhabi T10 League: भारतीय गोलंदाजाच्या ‘No-Ball’ने माजवली खळबळ, लावले जातायेत मॅच फिक्सिंगचे आरोप!
दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी! पंड्या नसला तरीही गुजरात खेळणार IPL 2024ची फायनल, म्हणाला, ‘फसवलं…’