भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025चा अंतिम सामना खेळला जाणार आहे (ICC womens world cup final INDW vs SAW). हा ऐतिहासिक सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार असून दोन्ही संघ पहिल्यांदाच विश्वविजेतेपद जिंकण्याच्या तयारीत आहेत. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या रोमांचक लढतीकडे लागले आहे. मात्र, या महामुकाबल्यावर पावसाचे सावट आहे.
फायनलदरम्यान नवी मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या तिथं पावसाचे सरी कोसळत आहेत आणि त्यामुळे सामना रद्द होण्याचीही शक्यता आहे. तसेच, सामना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी आयोजक सर्वतोपरी प्रयत्न करतील. अशा स्थितीत वर्ल्ड कप फायनलचा सामना 20-20 षटकांचा होऊ शकतो. त्यामुळे चाहत्यांचा प्रश्न आहे, जर पावसामुळे सामना कमी षटकांचा झाला, तर कोण ठरेल विजेता?
महिला वर्ल्ड कप 2025च्या अंतिम सामन्यावर खरोखरच पावसाचे संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत बेमोसमी पाऊस सुरू आहे. सामन्याच्या सुरुवातीपूर्वीही हलका पाऊस झाला. रिपोर्टनुसार, रविवार, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता सुमारास पावसाची शक्यता 15 टक्के वर्तवण्यात आली होती, तर संध्याकाळी 5 नंतर ती 30 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत. तथापि, ICCच्या नियमानुसार, फायनलसाठी 3 नोव्हेंबर हा राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. मात्र, चाहत्यांना सामना ठरलेल्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरलाच व्हावा अशी अपेक्षा आहे. जर सामना वेळेत पार पडला नाही, तर षटकांमध्ये कपात करून तो 20-20 ओव्हरचा केला जाऊ शकतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमधील टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या हेड-टू-हेड रेकॉर्डकडे पाहिल्यास भारतीय संघाचा वरचष्मा दिसतो. दोन्ही संघ आजवर 19 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी 10 सामने भारताने जिंकले, तर दक्षिण आफ्रिकेने 6 विजय मिळवले आहेत. 3 सामने अनिर्णित राहिले. शेवटच्या तीन सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली होती. त्यामुळे आकडेवारीनुसार, भारताचं पारडं दक्षिण आफ्रिकेपेक्षा जड आहे.
एकूण सामने – 19
भारत – 10 विजय
दक्षिण आफ्रिका – 6 विजय
अनिर्णित – 3 सामने
भारतीय संघ 2005 आणि 2017 नंतर तिसऱ्यांदा महिला वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यावेळी विजयाची अपेक्षा आणखी मोठी आहे कारण सामना आपल्या देशात मुंबईत होत आहे. महिला विश्वचषकाच्या इतिहासात ही पाचवी वेळ आहे की जेव्हा यजमान संघ फायनल खेळत आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया (1988), इंग्लंड (1993, 2017) आणि न्यूझीलंड (2000) यांनी हे यश मिळवलं होतं.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या विश्वचषकात 7 पैकी 3 सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. सेमीफायनलमध्ये भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 5 गडी राखून पराभूत केलं. त्यामुळे आता टीम इंडियाकडे विश्वचषक जिंकून इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी आहे.






