इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम मागील आठवड्यात ४ मे रोजी २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला. कोरोना व्हायरसचा संघांच्या बायोबबलमध्ये वाढलेल्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला हा निर्णय घ्यावा लागला. आता या हंगामातील एकूण ३१ सामने बाकी आहेत. हे सामने कुठे आणि कधी होणार याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. तरी पुढील ३ महिन्यात तरी आयपीएलचा हा हंगाम पूर्ण होणे शक्य नाही.
त्यामुळे, ही गोष्ट काही संघांच्या पथ्यावर पडू शकते. कारण आयपीएलचा हा हंगाम जेव्हा चालू झाला होता, त्यापूर्वी काही संघांचे खेळाडू आधीच दुखापतग्रस्त होते, तर काही खेळाडू सामने खेळताना दुखापतग्रस्त झाले. त्यांच्या दुखापती इतक्या मोठ्या होत्या की त्यांना स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली होती. पण आता जर साधारण ३ महिने उर्वरित हंगाम होणार नसेल, तर असे खेळाडू दुखापतीतून सावरुन पुन्हा जर उर्वरित हंगाम खेळवण्यात आला तर संघांशी जोडले जाऊ शकतात. अशाच ४ खेळाडूंवर आपण या लेखात नजर टाकू
४. श्रेयस अय्यर – दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरला आयपीएल २०२१ हंगाम सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळताना खांद्याची दुखापत झाली होती. त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्यामुळे तो या हंगामातून बाहेर पडला होता. त्याच्या ऐवजी संघाचे कर्णधारपद रिषभ पंतला सोपवले होते. पण आता जर उर्वरित हंगाम काही महिन्यांसाठी पुढे गेला असल्याने अय्यर दिल्ली संघात पुनरागमन करु शकतो.
३. बेन स्टोक्स – राजस्था रॉयल्सचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स यंदा संपूर्ण आयपीएल हंगामात खेळणार होता. मात्र, पंजाब किंग्सविरुद्धचा पहिलाच सामना खेळताना त्याला ख्रिल गेलचा झेल घेण्याच्या प्रयत्नात हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्याचीही गरज पडल्याने तो मायदेशी परतला. त्यानंतर जवळपास ३ महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर झाला आहे. पण जर पुढील काही महिन्यांनतर आयपीएल २०२१ हंगाम पूर्ण होणार असेल तर स्टोक्सला राजस्थान संघात पुनरागमनाची संधी आहे.
२. जोफ्रा आर्चर – मागीलवर्षी राजस्थान रॉयल्ससाठी महत्त्वाचा गोलंदाज ठरलेला जोफ्रा आर्चर यंदा मात्र, आयपीएलचा १४ वा हंगाम सुरु होण्यापूर्वीच दुखापतग्रस्त झाला होता. या आयपीएल हंगामापूर्वी इंग्लंडकडून भारताविरुद्ध टी२० मालिका खेळतानाच त्याच्या हाताच्या कोपराची दुखापत वाढली होती. त्यामुळे त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तो दुखापतीतून सावरत असून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्यामुळे काही महिन्यांनी जर आयपीएल २०२१ हंगाम पुर्ण झाला तर तो राजस्थान संघात पुनरागमन करु शकतो.
१. टी नटराजन – आयपीएलमध्ये सनरायढर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करत असलेला वेगवान गोलंदाज टी नटराजन दुखापतीमुळे आयपीएलच्या १४ व्या हंगामातून बाहेर झाला होता. त्याने या हंगामात केवळ २ सामने खेळले होते. पण नंतर त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीने डोके वर काढले, त्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागल्याने तो या हंगामात खेळण्यात उपलब्ध नव्हता. मात्र आता आयपीएलचा १४ वा हंगाम काही महिन्यांसाठी स्थगित झाला असल्याने नटराजन दुखापतीतून सावरुन पुन्हा नंतर संघात पुनरागमन करु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
लग्नाच्या आधीच ‘या’ क्रिकेटपटूंना झाली होती मुलं, एक आहे मास्टर ब्लास्टरचा खास मित्र
ममतांनी करुन दाखवलं! माजी भारतीय क्रिकेटपटूच्या हातात दिली बंगालच्या क्रीडामंत्रालयाची धुरा