भारतीय संघाला नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात वनडे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही सपाटून मार खावा लागला. भारताने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका २-० अशा फरकारने गमावली. या मालिकेत भारताच्या पराभवाचे मोठे कारण हे फलंदाजांना मोठ्या धावा करण्यात आलेले अपयश हे आहे. त्यामुळे सध्या भारतीय फलंदाजांवर टीका होत आहे.
या मालिकेनंतर भारताचे माजी निवड समीती अध्यक्ष संदिप पाटील यांनीही भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर टीका केलेली आहे. चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात रहाणे अपयशी ठरला. 4 डावांमध्ये 21.50 च्या सरासरीने तो केवळ 91 धावा करू शकला.
त्याच्याबद्दल बोलताना संदीप पाटील म्हणाले “मुंबईकडून खेळताना तो संथ खेळत असल्याचे मी ऐकले होते. अपयशाच्या भितीने असे होऊ शकते. त्याचा परदेशातील रेकॅार्ड उत्तम असलातरी तरी आता तो इतिहास आहे.”
“एकदा त्याच्यावर कसोटी क्रिकेटपटू असा शिक्का लागला आहे आणि वनडे संघातूनही तो बाहेर पडला आहे. त्यामुळे आता तो टेस्ट स्पेशलिस्ट (कसोटीपटू) म्हणून ओळख बनवू पाहत असेल. याप्रकारे तो स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. असं खेळून मी तंत्रशुद्ध पद्धतीने खेळतो आणि मी क्रीजवर टिकून उभा राहीन असं म्हणू शकता. तुम्हला फक्त क्रीज वर उभा राहायच असेल तर मग सिक्युरिटी गार्डलाच बोलवा. रन्स कोण काढणार?”
तसेच पाटील म्हणाले, “याचा अर्थ तुम्ही कसेही खेळा असा होत नाही. इतकी शतके झळकवल्यावर तुमची ही पद्धत चुकीची आहे. परदेशात माझ्यासारखा सामान्य खेळाडू सुद्धा टिकू शकला आणि हे तर चॅम्पियन खेळाडू आहेत.”
संदीप पाटील यांनी रहाणेच्या अपयशासाठी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफला पण जबाबदार धरलं. पाटील म्हणाले, “जर रहाणेला हे कळत नसेल तर मग शास्त्री आणि स्टाफ काय करत आहेत? एक फलंदाज असा खेळायला लागला तर मग इतरही असेच खेळायला लागतील. ज्याचा परिणाम संघावर होईल. नंतर खेळायला येणाऱ्या फलंदाजाला उगाचच असं वाटेल की प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी चांगली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
–‘कॅप्टनकूल’ धोनी म्हणतो, चेन्नई सुपर किंग्सने शिकवल्या या गोष्टी
–उद्या होणाऱ्या भारत-इंग्लंड टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याबद्दल सर्वकाही…
–न्यूझीलंड विरुद्ध संधी न मिळालेला हा खेळडू आता उतरणार रणजीच्या फायनलमध्ये