केपटाऊन येथे पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात संधी न मिळालेले अजिंक्य रहाणे, केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्माने पर्यायी सराव सत्रात सहभाग घेतला होता.
याचे फोटो बीसीसीआयने ट्विटरवरून शेयर केले आहेत. या तिघांबरोबरच यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलनेही या छोट्या सराव सत्रात सहभाग नोंदवला होता. ९० मिनिटाच्या या सराव सत्रात भारताचे सहाय्यक प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुणही उपस्थित होते.
Post game day and back to the grind #TeamIndia pic.twitter.com/Un22UU4DMb
— BCCI (@BCCI) January 9, 2018
भारतीय संघाने काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ७२ धावांनी पराभव स्वीकारला होता. या सामन्यात उपकर्णधार असूनही रहाणेला संघाबाहेर बसावे लागले होते त्यामुळे संघ व्यवस्थापनेवर टीका देखील करण्यात आली होती.
राहणेची भारताबाहेर कामगिरी चांगली झाली आहे, तरीही त्याच्या ऐवजी रोहित शर्माला संधी मिळाली होती. तसेच इशांत शर्मा ऐवजी बुमराहला या सामन्यात संधी मिळाली.
भारताने जरी या सामन्यात पराभव स्वीकारला असला तरीही भारतीय गोलंदाजांनी मात्र यात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटीस गिब्सन यांनी भारतीय संघ या ३ सामन्यांच्या मालिकेत वेगवान गोलंदाजांनाच घेऊन खेळेल अशी चेतावणी दिली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा सामना सेन्चुरियनला १३ जानेवारीपासून होणार आहे.