भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात 21 फेब्रुवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचे पुनरागमन झाले आहे.
या कसोटी मालिकेआधी न्यूझीलंड आणि भारत संघात टी20 आणि वनडे मालिका पार पडली होती. या दोन्ही मालिकेत बोल्ट दुखापतीमुळे खेळला नव्हता.
आता कसोटी मालिकेतून पुनरागमन करण्यापूर्वी बोल्टने म्हटले आहे की तो भारताचा कर्णधार विराट कोहलीला बाद करण्यास उत्सुक आहे.
बोल्ट म्हणाला, ‘मी विराटला गोलंदाजी करण्यास उत्सुक आहे. तो एक शानदार खेळाडू आहे. सर्वांना तो किती उत्कृष्ट आहे, हे माहित आहे. त्यामुळे मी वैयक्तिकरित्या जेव्हाही खेळतो तेव्हा त्याच्यासारख्या खेळाडूंना बाद करण्याचा विचार करतो. तसेच त्यांच्याविरुद्ध स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला बाद करण्याची मी वाट पाहत आहे.’
त्याचबरोबर भारतीय संघाबद्दल बोलताना बोल्ट म्हणाला, ‘त्यांचा(भारतीय संघ) चांगला संघ आहे. ते सध्या आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपमध्ये अव्वल क्रमांकावर आहेत. तसेच सामना कसा खेळायचा याबाबद त्यांचे विचार फार स्पष्ट आहेत.’
तसेच भारताविरुद्ध खेळण्याआधी न्यूझीलंडला डिसेंबर-जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव स्विकारावा लागला होता. याबद्दल बोल्ट म्हणाला, ‘ती मालिका कठिण होती. पण आम्ही त्या पराभवातून आता पुनरागमन करत आहोत, हे पाहून चांगले वाटत आहे.’