फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये नुकतीच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची सांगता झाली. यंदाचा ऑलिम्पिक हंगाम विविध कारणांमुळे चर्चेत राहिला. दरम्यान अल्जेरियन बॉक्सर इमान खेलिफ हिच्या लिंगावरुन मोठा वाद झाला. महिलांच्या वेल्टरवेट स्पर्धेत राउंड ऑफ 16 मध्ये खेलिफचा सामना इटलीच्या अँजेला कारिनीशी झाला; पण कारिनीने 46 सेकंदात मॅचमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. खेलिफच्या माऱ्यामुळे कारिनीने मॅच सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर खेलिफच्या लिंगावरुन तिच्यावर भरपूर टीका झाली.
मात्र सर्व टीकांवर दुर्लक्ष करत खेलिफने महिला बॉक्सिंगच्या वेल्टरवेट प्रकारात अंतिम फेरी गाठली. तिथे तिने चीनची बॉक्सर आणि विश्वविजेत्या यांग लिऊचा पराभव करून सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. आता खेलीफने आपल्याविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात मोठे पाऊल उचलले आहे.
इमान खेलिफने सोशल मीडियावर तिच्याविरोधात द्वेष पसरवणाऱ्या आणि ट्रोल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, खेलीफने तिच्या लिंगाबद्दल द्वेषपूर्ण टिप्पण्या आणि विधानांबद्दल तक्रार केली आहे. हे कायदेशीर पाऊल उचलल्यानंतर तिने सांगितले की, सोशल मीडियावर तिच्याबद्दल जे काही बोलले जात आहे ते नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. तिला जगभरातील लोकांचे विचार बदलायचे आहेत, त्यामुळेच तिने हे पाऊल उचलले आहे.
विजयानंतर खेलीफ म्हणाली होती की, ऑलिम्पिक चॅम्पियन बनणे आणि सुवर्णपदक जिंकणे हे तिचे 8 वर्षांचे स्वप्न होते, जे आता पूर्ण झाले आहे. ती देखील इतर महिलांसारखीच आहे.
कोण आहे इमान खेलिफ?
ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली 25 वर्षांची खेलिफ अल्जेरियातल्या टियारेट शहरातली आहे. ती युनिसेफची ब्रँड अँबेसेडरदेखील आहे. मुलींसाठी बॉक्सिंग योग्य नाही, असं तिच्या वडिलांचं मत होतं. जगातल्या सर्वांत मोठ्या मंचावर सुवर्णपदक जिंकून नवीन पिढीला प्रेरित करण्याची इच्छा खेलिफच्या मनात होती. 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिपपासून तिने तिच्या बॉक्सिंग करिअरची सुरुवात केली. तिथे ती 17 व्या स्थानावर राहिली होती. 2021मधल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत, आयर्लंडच्या केली हॅरिंग्टनने तिचा पराभव केला होता. जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एमी ब्रॉडहर्स्टकडून तिचा पराभव झाला. त्यामुळे खेलिफला दुसरं स्थान मिळालं होतं. 2022 मध्ये आफ्रिकन चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक पटकावलं होतं.
हेही वाचा –
आश्चर्यकारक! स्टंपला चेंडू लागला तरीही फलंदाज बाद नाही, पाहा VIDEO
धाडसी फलंदाज, भारताच्या मधल्या फळीचा कणा! 1983 वर्ल्डकप विजयाच्या हिरोचा आज वाढदिवस
काय सांगता! धोनीनं केली 15 कोटी रुपयांची फसवणूक? बीसीसीआयनं उत्तर मागितलं