---Advertisement---

वादळी खेळी करणाऱ्या ईशान किशनवर सूर्यकुमार यादव चिडला होता, सामन्यानंतर कर्णधाराचा धक्कादायक खुलासा

On: शनिवार, जानेवारी 24, 2026 7:45 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवला. रायपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात 209 धावांचं आव्हान भारताने अवघ्या 15.2 षटकांत तीन गडी गमावत पूर्ण करत मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली. या विजयासह भारताने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग सर्वात कमी चेंडूत करण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर केला.

या सामन्यात ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या 49 चेंडूत 122 धावांची निर्णायक भागीदारी झाली. मात्र सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादवने एक रंजक खुलासा केला. पॉवरप्ले दरम्यान ईशान किशन सतत स्ट्राइक घेत असल्याने आपल्याला फलंदाजीची संधी कमी मिळाली आणि त्यामुळे थोडा रागावलो होतो, असं सूर्यकुमारने सांगितलं.

सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, “ईशानने नेमकं काय खाल्लं होतं किंवा काय प्री-वर्कआउट केलं होतं, हे मला माहीत नाही. पण 6 धावांवर 2 विकेट गमावून फलंदाजी करत असताना पॉवरप्ले संपेपर्यंत 67-70 धावांपर्यंत स्कोर नेणारा खेळाडू मी पहिल्यांदाच पाहिला. 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना फलंदाजांनी मोकळेपणाने खेळावं, स्वतःवर विश्वास ठेवावा, हेच आम्हाला अपेक्षित असतं आणि ईशानने आज तेच करून दाखवलं.”

पुढे तो म्हणाला, “पॉवरप्लेमध्ये मला स्ट्राइक मिळत नव्हती म्हणून मी थोडा चिडलो होतो. पण मला माहीत होतं की पुढे संधी मिळाल्यावर मी ते कव्हर करेन.” सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत 23 डावांपासून चाललेला अर्धशतकाचा दुष्काळ संपवला. त्याच्या या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

ईशान किशनने 32 चेंडूत 76 धावा करत सामन्याचा पाया रचला, तर शिवम दुबेने नाबाद 36 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री, जेकब डफी आणि ईश सोढी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या विजयामुळे टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची लय अधिक मजबूत झाल्याचं चित्र दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---