सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारा अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमार याला युवा कुस्तीपटूला केलेली मारहाण व त्यानंतर त्या कुस्तीपटूचा झालेला मृत्यू चांगलाच महागात पडत असलेला दिसतोय. सागर राणा या कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी सध्या दिल्ली पोलिसांनी त्याला सहा दिवसांच्या रिमांडवर ठेवले असून, पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे असल्याने पूर्ण कायदेशीर प्रक्रिया झाल्यावर सुशीलला शिक्षा होणे देखील जवळपास निश्चित झाले आहे.
मात्र, ऑलिम्पिक खेळल्यानंतर तुरुंगाची हवा खाणारा सुशील पहिलाच कुस्तीपटू नाही. यापूर्वी देखील विविध देशांच्या ६ कुस्तीपटूंना गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. आज आपण त्याच खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
१) पीटर फारकास-
हंगेरीला १९९२ च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत सुवर्णपदक मिळवून देणारा कुस्तीपटू पीटर फारकास याला तुरुंगाची हवा खायला लागली होती. शेतामध्ये गांजाची लागवड केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला सात वर्ष शिक्षा सुनावली गेलेली.
२) टोनी हन्नुला
सन १९८४ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला फिनलंडचा कुस्तीपटू टोनी हन्नुला याला देखील गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. त्याने १९८९ ते २००० या काळात दरोड्यासारख्या कृत्याची शिक्षा भोगली.
३) राइमो हिरवोनेन-
फिनलंडचा आणखी एक ऑलिम्पियन कुस्तीपटू व १९७२ म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा राइमो हिरवोनेन याला दरोडा व हिंसा करणे या गुन्ह्याखाली सजा भोगावी लागली होती.
४) अलेक्झांडर कोल्चिन्स्की-
या खेळाडूच्या नावे ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्ण पदके आहेत. कोल्चिन्स्की याने १९७६ आणि १९८० च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये ग्रीको-रोमन शैलीत सोव्हिएत संघासाठी ही कामगिरी केली होती. खंडणीप्रकरणी कोल्चिन्स्की यांना सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली. १९९६ मध्ये त्याला युक्रेनचे अध्यक्ष लियोनिद कुचमा यांनी पॅरोल मंजूर केला होता.
५) डॉक स्ट्रॉंग-
या अमेरिकन कुस्तीपटूने १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. स्ट्रॉंगला सार्वजनिक ठिकाणी नशा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. १९५२ मध्ये सजा भोगत असताना, त्यांनी तुरुंगात आत्महत्या केलेली.
६) एलेक्सिस व्हिला-
क्युबन कुस्तीपटू असलेल्या व्हिलाने १९९६ अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. व्हिला दोन वेळा कुस्तीमध्ये विश्वविजेता देखील राहिला होता. लॉडरहेड-हॉलीवुड विमानतळावर त्याने दहशत माजविण्याचा प्रयत्न केलेला. २०२० मध्ये त्याला एका खून प्रकरणी १५ वर्षाची शिक्षा झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दम लगाके हैशा! रिषभ पंतने ‘या’ व्यक्तीला दाखवला आपला दम; उचलून फिरवले गरगर
बक्कळ पैसा! पाकिस्तानच्या प्रशिक्षकापेक्षा पाच पट कमावतात शास्त्री, बघा इतर प्रशिक्षकांची पगार
त्रासदायक ठरत असलेल्या आफ्रिदीला अझरूद्दीनने दिला होता ‘हा’ सल्ला, पाहा व्हिडिओ