जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी टी२० लीग आयपीएलच्या १३ व्या हंगामातील दहावा सामना सोमवारी (२८ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
प्रथम फलंदाजीला आलेल्या बेंगलोर संघाला सलामीवीर देवदत्त पडिक्कल आणि ऍरॉन फिंचने चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. यामध्ये फिंचने (५२) आणि पडिक्कलने (२३) धावा केल्या होत्या. पहिल्या विकेटच्या रुपात फिंच बाद झाला. त्यानंतर पडिक्कलने पुढे चमकदार कामगिरी करत १६ व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण करत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या अर्धशतकासह तो आयपीएलच्या इतिहासात पहिल्या ३ डावांमध्ये २ अर्धशतके करणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी त्याने या हंगामातील तिसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळताना ५६ धावांची खेळी केली होती.
पड्डीकलपूर्वी कुमार संगकारा व मॅथ्यू हेडनने २००८, नमन ओझा २००९ आणि पॉल कॉलिंगवूडने २०१० साली आयपीएलमध्ये असा कारनामा केला होता.
पडिक्कलने आतापर्यंत आयपीएलमध्ये ३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३७ च्या सरासरीने आणि १३२.१४ च्या स्ट्राईक रेटने १११ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २ अर्धशतके ठोकली आहेत.
आयपीएलमध्ये पहिल्या ३ डावांमध्ये २ अर्धशतके करणारे फलंदाज
२००८- कुमार संगकारा
२००८- मॅथ्यू हेडन
२००९- नमन ओझा
२०१०- पॉल कॉलिंगवूड
२०२०- देवदत्त पडिक्कल






