मँचेस्टर येथे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडकडून दोन्ही डावात दोन वेगवेगळ्या फलंदाजांच्या जोड्यांनी सलामीला फलंदाजी केली. त्यामुळे एक खास विक्रम झाला आहे.
इंग्लंडकडून या सामन्यात पहिल्या डावात रॉरी बर्न्स आणि डॉम सिब्ले यांनी सलामीला फलंदाजी केली होती. तर दुसऱ्या डावात बेन स्टोक्स आणि जोस बटलर हे दोघे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. त्यामुळे एकाच कसोटी सामन्यात ४ खेळाडू सलामीवीर म्हणून खेळण्याची ही ३६ वर्षांनंतरची पहिली घटना आहे.
याआधी असे शेवटचे १९८४ साली झाले होते. १९८४ ला भारताने इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथे खेळताना एकाच कसोटी सामन्यात सुनील गावस्कर, अंशुमन गायकवाड, रवी शास्त्री आणि मनोज प्रभाकर अशा ४ खेळाडूंना सलामीवीर म्हणून खेळवले होते.
तसेच आत्तापर्यंत कसोटी इतिहासात इंग्लंडने १७ व्यांदा एकाच कसोटी सामन्यात ४ खेळाडूंना सलामीवीर म्हणून खेळवले आहे. इंग्लंडने याआधी शेवटचे एकाच कसोटी सामन्यात ४ खेळाडूंना सलामीवीर म्हणून खेळवण्याची घटना १९५४ ला किंग्सटन येथे घडली होती.
त्यावेळी इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध सर लिओनार्ड हटन,ट्रेवर बेली,टॉम ग्रेव्हनी आणि विली वॉट्सन यांना इंग्लंडने सलामीवीर म्हणून खेळवले होते. विशेष म्हणजे याच सामन्यातून वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांनी पदार्पण केले होते. त्यानंतर आता ६६ वर्षांनंतर पहिल्यांदाच इंग्लंडने मँचेस्टर येथे सुरु असलेल्या कसोटीत ४ जणांला सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी दिली.
सध्या मँचेस्टर येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात आज(२० जुलै) इंग्लंडने दुसरा डाव १२९ धावांवर घोषित केला आणि वेस्ट इंडिजला पहिल्या डावातील १८२ धावांच्या आघाडीसह ३१२ धावांचे आव्हान दिले आहे.
इंग्लंडकडून या सामन्यात पहिल्या डावात रॉरी बर्न्स आणि डॉम सिब्लेने २९ धावांची तर दुसऱ्या डावात बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी केवळ १ धावेची सलामी भागीदारी केली आहे.
या सामन्यात इंग्लंडने पहिला डाव ४६९ धावांवर घोषित केला होता. वेस्ट इंडिजचा पहिला डाव २८७ धावांवर संपुष्टात आला होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
स्टोक्स झाला ओपनर ते ११व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा ५वा खेळाडू, पहा बाकी ४ क्रिकेटपटूंची नावं
ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पहा कसा असेल हा दौरा
भारताला विश्वचषक जिंकून देणारा असा खेळाडू, ज्याला कधीच मिळाले नाही कामगिरीचे श्रेय






