आयपीएल २०२६ चा हंगाम चाहत्यांच्या चांगलाच लक्षात राहिल. राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने अनेक आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यामुळे त्याची भारत अ संघात निवड झाली. सध्या भारत अ संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून आतापर्यंत संघाने खेळलेल्या तिन्ही सामन्यात वैभवला संधी मिळाली. या तिरंगी वनडे मालिकेत तो कशी सुरूवात करतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. वैभवने आयपीएलमध्ये एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडला, मात्र श्रीलंकेच्या दौऱ्यात त्याला पहिला षटकार मारण्यासाठी तब्बल ३९ चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली.
दाम्बुला येथे सोमवारी (१५ जून) भारत अ विरुद्ध श्रीलंका अ सामना खेळला जात आहे. या सामन्यात वैभव १४ चेंडूंत २१ धावा करत बाद झाला. त्याने याआधी या तिरंगी वनडे मालिकेत खेळलेल्या दोन्ही १४ धावा (१२) विरुद्ध श्रीलंका अ आणि ४४ धावा (२२) विरुद्ध अफगाणिस्तान अ अशा खेळी केल्या होत्या. या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने एकही षटकार मारला नाही. सोमवारी मात्र त्याने पहिले पाच चेंडू खेळल्यानंतर पहिला षटकार मारला आणि आपली प्रतीक्षा संपवली.
वैभवने या तिरंगी मालिकेत आतापर्यंत तीन डावांमध्ये खेळताना ७९ धावा केल्या आहेत. तो या मालिकेत केवळ जमिनीवरून मारलेल्या फटक्यांवर लक्ष केंद्रित करताना दिसला, मात्र जेव्हा-जेव्हा त्याने आपली विकेट गमावली, तेव्हा तो मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नातच बाद झाला आहे. या मालिकेत भारताचा आणखी एक साखळी सामना बाकी असून त्यामध्ये तो कशी कामगिरी करेल याकडे लक्ष असेल.
तसेच वैभवने या मालिकेत आतापर्यंत जरी एकच षटकार मारला असला, तरी त्याचा स्ट्राईक रेट उत्तम राहिला आहे. त्याने पहिल्या सामन्यात ११६ पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. तसेच दुसऱ्या सामन्यात त्याने २०० च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या.
वैभवची भारताच्या वरिष्ठ टी२० संघातही निवड झाली आहे. त्याला आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यांसाठी तसेच आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी संघात निवडले आहे. या तिरंगी मालिकेनंतर तो आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.





