वेस्ट इंडीज येथे सुरू असलेल्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकात शनिवारी (२९ जानेवारी) भारत आणि बांगलादेश या संघांमध्ये चौथा उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला गेला. गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात ५ गडी राखून विजय संपादन केला. यासह भारतीय संघाने मागील विश्वचषकातील अंतिम फेरीतील पराभवाची सव्याज परतफेड केली. या विजयासह संघाने उपांत्य फेरीत धडक मारली असून, उपांत्य फेरीत त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल.
भारतीय संघाची शानदार गोलंदाजी
या सामन्यात साखळी फेरीला मुकलेल्या नियमित कर्णधार यश धूल व उपकर्णधार शेख राशीद यांनी पुनरागमन केले. यशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमार याने सार्थ ठरविला. त्याने केवळ १४ धावांवर बांगलादेशचे तीन फलंदाज माघारी धाडले. त्यानंतर विकी ओस्तवालने दोन गडी बाद करत बांगलादेशाला आणखी संकटात टाकले. कौशल तांबे, राजवर्धन हंगारगेकर व अंगक्रिश रघुवंशी यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत बांगलादेशचा डाव ३७.१ षटकात १११ धावांवर संपविला. बांगलादेशसाठी आठव्या क्रमांकावरील फलंदाज मेहरोबने सर्वाधिक ३० धावा काढल्या.
बांगलादेशने ठेवलेले ११२ धावांचे सोपे लक्ष पार करताना भारताची सुरुवात खराब झाली. या स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेला हरनूर सिंग दुसऱ्याच षटकात खातेही न खोलता माघारी परतला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी अंगक्रिश रघुवंशी व शेख राशीद यांनी ७० धावांची शानदार भागीदारी केली. मात्र, अंगक्रिश व राशीद हे अनुक्रमे ४४ व २६ धावांवर बाद झाले. त्यानंतरही सिद्धार्थ यादव ६ व युगांडाविरूद्ध नाबाद दिडशतकी खेळी करणारा राज बावा शून्यावर बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत येतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, कर्णधार यश धूलने संयम दाखवला. अखेर ३१ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कौशल तांबेने षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला.
भारतीय संघ पाचव्या विजेतेपदाच्या शोधात
भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत चार वेळा ही स्पर्धा आपल्या नावे केली असून, मागील तीनही स्पर्धांमध्ये भारतीय संघ अंतिम सामना खेळला आहे. भारताने अखेरच्या वेळी २०१८ मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वात हा विश्वचषक जिंकला होता. दक्षिण आफ्रिका येथे झालेला २०२० मधील विश्वचषकात भारताला बांगलादेशकडून अटीतटीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.