भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला भारताने दमदार सुरुवात केली आहे. अशाप्रकारे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या दिवशीच भारताने हा सामना 295 धावांनी जिंकला. भारतीय संघाच्या विजयाच्या शिलेदारांबद्दल सांगायचे तर, जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जयस्वाल यांनी सर्वाधिक योगदान दिले असले तरी त्यांच्याशिवाय आणखी तीन खेळाडू आहेत. त्यांच्याशिवाय ही कसोटी जिंकणे सोपे नव्हते.
पर्थ कसोटी अनेक गोष्टींसाठी लक्षात राहणार असली तरी भारतीय युवा ब्रिगेडने ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर हरवले हे उल्लेखनीय आहे. रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि शुबमन गिलसारख्या खेळाडूंची अनुपस्थिती हा कसोटी विजय अधिक खास बनवते.
पर्थ कसोटी सामन्यातील पाच शिलेदारांवर एक नजर टाकूया.
जसप्रीत बुमराह
जेव्हा टीम इंडिया 150 रन्सवर ऑलआऊट झाली होती तेव्हा टीम इंडिया ही टेस्ट जिंकू शकेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. बुमराहने पहिल्या डावात 18 षटकात केवळ 30 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. बुमराहच्या या पंजासह आणखी एक गोष्ट खूप खास होती ती म्हणजे मैदानावरील त्याचे कर्णधारपद. बुमराहला यासाठी माजी कर्णधार विराट कोहलीचीही पूर्ण साथ मिळाली, पण त्याने गोलंदाजीत ज्या प्रकारे बदल केले आणि ऑस्ट्रेलियावर सातत्याने दबाव कायम ठेवला. त्याचाही उल्लेख करणे आवश्यक आहे. दुसऱ्या डावातही बुमराहने सुरुवातीलाच धक्के देऊन ऑस्ट्रेलियाला प्रचंड दडपणाखाली आणले आणि दुसऱ्या डावात धोकादायक दिसणाऱ्या ट्रॅव्हिस हेडची महत्तवपूर्ण विकेटही घेतली.
यशस्वी जयस्वाल
ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळण्यासाठी आलेल्या यशस्वी जयस्वालची सुरुवात चांगली झाली नसली तरी पहिल्या डावातील सर्व अडचणी त्याने दुसऱ्या डावात भरून काढल्या. यशस्वी पहिल्या डावात खाते न उघडता बाद झाला आणि दुसऱ्या डावात त्याने 161 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले.
केएल राहुल
या सामन्यात केएल राहुलचे योगदान अजिबात विसरता कामा नये. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात एका टोकाकडून विकेट पडत असताना राहुलने 74 चेंडूत 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. राहुल दुर्दैवी होता. त्याला ज्या पद्धतीने बाद देण्यात आले, तसे झाले नसते तर कदाचित त्याने पहिल्या डावात किमान अर्धशतक ठोकले असते. पण दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक ठोकले आणि यशस्वीसोबत पहिल्या विकेटसाठी 201 धावांची भागीदारीही केली. केएलने 176 चेंडूत 77 धावांचे योगदान दिले.
विराट कोहली
विराट कोहलीसाठी ऑस्ट्रेलियात खेळणे कसे असते हे सांगण्याची गरज नाही. ऑस्ट्रेलियातील विराटच्या रेकॉर्डवरून त्याला येथे खेळताना किती मजा येते हे दिसून येते. पहिल्या डावात पाच धावांवर बाद झालेल्या विराटने दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले हे त्याचे कारकिर्दीतील 30 वे कसोटी शतक होते. विराटच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला सामन्यातून पूर्णपणे बाहेर काढले.
नितीशकुमार रेड्डी
नितीश कुमार रेड्डी, टीम इंडियासाठी पदार्पण कसोटी सामना खेळत असून त्यांनी दोन्ही डावात केवळ आपल्या फलंदाजीने प्रभावित केले, इतकेच नव्हे त्ययाने तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर विकेटही घेतली. नितीशने पहिल्या डावात भारतासाठी सर्वाधिर धावांची (41) खेळी खेळली. त्याच्या खेळीने सामन्यात मोठा फरक पडला. नितीशने 59 चेंडूत 41 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने सहा चौकार एक षटकार ठोकला. यानंतर दुसऱ्या डावात नितीशने 27 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या. गोलंदाजी करताना त्याने मिचेल मार्शची विकेट घेतली.
हेही वाचा-
WTC Points table; ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया अव्वल स्थानी, ऑस्ट्रेलियाची चक्क इतक्या स्थानी घसरगुंडी!
गाबानंतर पर्थचाही किल्ला ढासळला! पहिल्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय
“शपथ घेऊन सांगतो समोर लागला”, डीआरएस घेण्यासाठी हर्षित राणाचं मजेशीर कृत्य