भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या बहुचर्चित क्रिकेट मालिकांना २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची टी२० मालिका होईल. दौऱ्याच्या अखेरीस, चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सिडनी येथे शुक्रवारपासून (२७ नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. या सामन्यांमध्ये भारतातर्फे हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा हे दोन अष्टपैलू खेळाडू मैदानात उतरू शकतात. या दोघांवरही वेगाने धावा काढण्याची आणि बळी मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
यापूर्वी, भारताने जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडे सामने खेळले आहेत, तेव्हा तेव्हा काही खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात योगदान दिलेले दिसून येते. आज आपण, भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात केलेल्या सर्वोत्तम पाच अष्टपैलू कामगिरींवर नजर टाकणार आहोत.
१) रवी शास्त्री ( ५३ धावा आणि ३ बळी) विरुद्ध न्यूझीलंड, १९८५ वर्ल्ड चंपियनशिप ऑफ क्रिकेट, सिडनी
विश्वचषकानंतर सर्वात मोठी मानली गेलेली वनडे स्पर्धा म्हणून, ऑस्ट्रेलियात १९८५ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट आयोजित केली गेली होती. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांचा सिडनीच्या मैदानावर आमना-सामना झाला. न्यूझीलंडचा डाव २०६ धावांवर रोखण्यात भारताचे अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री यांचा मोठा वाटा होता.
रवी शास्त्री यांनी जॉन रीड, जेरेमी कोने व सर रिचर्ड हॅडली यांचे बळी मिळवले. त्यासाठी त्यांनी फक्त ३१ धावा खर्च केल्या. फलंदाजीतही चमकदार कामगिरी करताना शास्त्री यांनी अर्धशतक झळकावले. भारताने या सामन्यात ७ गडी राखून विजय साजरा केला. पुढे, अंतिम सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवत, भारताने स्पर्धा जिंकण्याचा कारनामा केला. रवी शास्त्री यांनाच मालिकावीर म्हणून निवडले गेले होते.
२) सचिन तेंडुलकर ( ५४ धावा १ बळी) विरुद्ध पाकिस्तान, १९९२ क्रिकेट विश्वचषक, सिडनी
कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान हे दोन देश प्रथमच क्रिकेट विश्वचषकात भिडणार होते. १९ वर्षीय सचिन तेंडुलकरने इम्रान खान, वसिम अक्रम, मुश्ताक अहमद या दिग्गज गोलंदाजांचा सामना करत ६२ चेंडूत ५४ धावांची लाजवाब खेळी केली. भारताच्या डावातील हे एकमेव अर्धशतक होते.
फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर सचिनने गोलंदाजीतही कमाल दाखवली. सचिनने आपल्या १० षटकात ३७ धावा देताना पाकीस्तानकडून सर्वाधिक ६२ धावा बनवणाऱ्या आमीर सोहेलचा महत्वपूर्ण बळी मिळवला. सचिनने याच सामन्यात आपला विश्वचषकातील पहिला सामनावीर पुरस्कार पटकावला होता.
३) संदीप पाटील ( ६४ धावा आणि १ बळी ) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९८० वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट, मेलबर्न
ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताचा हा पहिला वनडे सामना होता. वनडे पदार्पण करत असलेल्या संदीप पाटील यांनी या सामन्यात ७० चेंडूंमध्ये ६४ धावांची आक्रमक खेळी केली होती. पाटील यांच्या खेळीमुळे भारताने ४९ षटकात २०८ धावा उभारल्या.
गोलंदाजी करतानाही पाटील यांनी सलामीवीर किम ह्यूज यांना माघारी पाठवत, ऑस्ट्रेलियाच्या डावाला गळती लावली. त्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १४२ धावांवर संपुष्टात आला. पाटील यांनी १० षटकात ३१ धावा देत १ बळी मिळवला.
४) कपिल देव ( ५४ धावा आणि १ बळी ) विरुद्ध न्यूझीलंड, १९८६ बेन्सन अँड हेजेस कप, ब्रिस्बेन
भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या कपिल देव यांनी या सामन्यात १० षटके टाकताना अवघ्या २८ धावा देऊन १ बळी आपल्या नाव केला होता. कपिल यांच्या किफायतशीर गोलंदाजीमुळे न्यूझीलंड संघ २५९ धावन पर्यंतच मजल मारू शकलेला.
गोलंदाजीतील उत्तम कामगिरीनंतर कपिल यांनी फलंदाजीतही आपले योगदान दिले. कृष्णम्माचारी श्रीकांत, सुनील गावसकर व मोहिंदर अमरनाथ यांच्या खेळ्यांनंतर कपिल देव यांनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ५३ चेंडूत ५४ धावांची विस्फोटक खेळी केली. भारत या सामन्यात पाच गड्यांनी विजय मिळवण्यात यशस्वी ठरला होता.
५) कपिल देव ( ७५ धावा व १ बळी ) विरुद्ध न्यूझीलंड, १९८० बेन्सन अँड हेजेस कप, ब्रिस्बेन
या सामन्यात भारताची अवस्था ५ बाद ८४ अशी नाजूक होती. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कपिल देव यांनी सामन्याचे चित्र पालटले. आक्रमक फटके खेळताना त्यांनी ५१ चेंडूत ७५ धावांची तुफानी खेळी केली. त्यांच्या या खेळीमुळे भारतीय संघ २०९ धावांची मजल मारू शकला.
गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करताना कपिलदेव यांनी भारताला पहिला बळी मिळवून दिला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारताने २ चेंडू राखून विजय साजरा केला.
महत्त्वाच्या बातम्या –
“यष्टीरक्षकांसाठी धोनी एक आदर्श, भूमिका कशी पार पाडायची हे त्याने दाखवून दिलं“
विराट आला लयीत! बीसीसीआयने सरावाचा व्हिडिओ केला शेअर
मोहम्मद शमीच्या पत्नीला फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीला पश्चिम बंगालमधून अटक
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय धुरंदर
दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्याबद्दलच्या १२ रंजक गोष्टी, वाचा
ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज