भारताविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत सामील अनेक खेळाडूंची निवड केली होती. मात्र, आता त्यांच्यापैकी अधिकतर खेळाडू मायदेशी परतणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) ताफ्यात झालेल्या बदलाविषयीची माहिती दिली. तसेच, सांगितले की, ट्रेविस हेड वगळता इतर सर्व विश्वचषक विजेते खेळाडू मायदेशी परततील. यापैकी स्टीव्ह स्मिथ आणि ऍडम झम्पा दुसऱ्या सामन्यानंतरच मायदेशी परतले होते. अशात या खेळाडूंविषयी ऑस्ट्रेलिया वनडे आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्स याने सहानुभूती व्यक्त केली आहे.
काय म्हणाला कमिन्स?
सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये विश्वचषक ट्रॉफीसह उपस्थित पॅट कमिन्स (Pat Cummins) याने माध्यमांशी बोलताना, भारतातून मायदेशी परतत असलेल्या खेळाडूंविषयी मोठे भाष्य केले. तो म्हणाला की, विश्वचषक खेळणाऱ्या खेळाडूंना परत बोलावण्याचा निर्णय समजू शकतो. ही इतर खेळाडूंसाठी एक चांगली संधी असेल.
ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या हवाल्याने कर्णधार कमिन्स म्हणाला की, “मी त्यांच्यावर नाराज नाहीये. ते काही महिन्यांपासून खूपच व्यस्त आहेत. तीही माणसं आहेत. ते रोबोट नाहीत. सर्वकाही विश्वचषकात लावणे आणि नंतर काही दिवसांनी खेळणे, मला त्यांच्याशी काहीही तक्रार नाही.”
ऑस्ट्रेलियन माध्यमांनुसार, स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि ऍडम झम्पा (Adam Zampa) गुवाहाटी येथे होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी मायदेशी परतले आहेत. तसेच, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिस आणि सीन ऍबॉट हे तिसऱ्या सामन्यानंतर मायदेशी परततील. झम्पा आणि मॅक्सवेल यांनी पहिला सामना खेळला नव्हता आणि तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात संघात पुनरागमन केले होते. तसेच, ट्रेविस हेड भारतातच थांबणार आहे, ज्याने मालिकेतील अद्याप एकही सामना खेळला नाहीये.
यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिप आणि मोठे फटके मारण्यासाठी पटाईत असलेला बेन मॅकडर्मोट आधीच गुवाहाटीतील सामन्यासाठी संघात सामील झाले आहेत. ते तिसऱ्या सामन्यातील निवडीसाठी उपलब्ध आहेत. तसेच, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज बेन ड्वारशुइस आणि फिरकीपटू ख्रिस ग्रीन हेदेखील तिसऱ्या टी20 सामन्यानंतर संघात सामील होतील. (ind vs aus 2023 world cup winner captain pat cummins backs australia s decision to overhaul t20i squad in india)
हेही वाचा-
मोठी बातमी! नामीबिया T20 World Cup 2024साठी क्वालिफाय, 19 संघ फिक्स; आता 1 जागेसाठी 3 संघात टक्कर
T20 World Cup: विराटच्या विक्रमाची बरोबरी करणारा डेरिंगबाज सिकंदर! हॅट्रिक घेत इतिहासही घडवला