Team India Record: पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले आहे. रविवारी (दि. 26 नोव्हेंबर) पार पडलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी पराभव केला. या विजयासह भारत मालिकेत 2-0ने आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, या सामन्यात भारतीय संघाच्या पहिल्या 3 फलंदाजांनी जबरदस्त फटकेबाजी करत भारताच्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला. चला तर, तो विक्रम कोणता आहे, पाहूयात…
तिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय (Team India Record) संघाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. यावेळी भारताच्या तिन्ही फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या. यापूर्वी आजपर्यंत अव्वल 3 फलंदाजांनी भारतासाठी अशी कामगिरी कधीच केली नव्हती. विशेष म्हणजे, जागतिक क्रिकेटमधील ही फक्त पाचवीच घटना आहे. कसोटी खेळणाऱ्या देशांचा विचार केला, तर भारत या यादीत जोडला जाणारा फक्त दुसरा देश आहे.
भारताकडून या सामन्यात डावाची सुरुवात करताना यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांनी वादळी सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 5.5 षटकात 77 धावांची भागीदारी केली. यशस्वी यावेळी 25 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 53 धावा करून बाद झाला. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इशान किशन (Ishan Kishan) यानेही धावांची गती कमी होऊ दिली नाही. त्याने 32 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या. तसेच, ऋतुराजने अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी 58 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने 4 विकेट्स गमावत 235 धावा केल्या.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये अव्वल 3 फलंदाजांनी अर्धशतक करणारे संघ
ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, ऍडलेड, 2019
बरमूडा विरुद्ध बहामास, कूलिज, 2021
कॅनडा विरुद्ध पनामा, कूलिज, 2021
बेल्जियम विरुद्ध माल्टा, जेंट, 2022
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिरुवनंतपुरम, 2023*
भारताच्या 236 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली राहिली नाही. त्यांनी पॉवरप्लेमध्येच ग्लेन मॅक्सवेल याच्यासह एकूण 3 विकेट्स गमावल्या. त्यात मागील सामन्यातील शतकवीर जोश इंग्लिसच्या विकेटचाही समावेश होता. मधल्या फळीत काही वेळ मार्कस स्टॉयनिस आणि टीम डेविड यांनी विस्फोटक फलंदाजी केली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. कर्णधार मॅथ्यू वेड याने अखेरपर्यंत झुंज दिली, पण ऑस्ट्रेलिया 20 षटकात 9 विकेट्स गमावत 191 धावाच करू शकला. वेड 23 चेंडूत 42 धावा करून नाबाद राहिला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई चमकले. त्यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. (ind vs aus 2nd t20i indian players yashasvi jaiswal ruturaj gaikwad ishan kishan make record know here)
हेही वाचा-
रिंकूची विस्फोटक फलंदाजी पाहून कॅप्टन सूर्याला आली ‘या’ दिग्गजाची आठवण; म्हणाला, ‘सर्वांना माहितीये…’
INDvsAUS 2nd T20: सलग दुसरा विजय मिळवताच सूर्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी खेळाडूंना आधीच…’