भारतीय संघाने रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये विजयी पताका फडकावली. शुक्रवारी (दि. 1 डिसेंबर) 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 20 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह 3-1ने आघाडी मालिकाही खिशात घातली. या सामन्यात रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांच्या वादळी फलंदाजीनंतर अक्षर पटेल याने गोलंदाजीतून कहर केला. या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचे विधान चर्चेत आहे.
काय म्हणाला सूर्या?
सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) म्हणाला, “नाणेफेकीव्यतिरिक्त सर्वकाही आमच्या हिशोबाने घडले. आमचे युवा खेळाडू ज्याप्रकारे प्रदर्शन करत आहेत, ते पाहून चांगले वाटत आहे. आजच्या सामन्याच्या स्थितीची पर्वा न करता सर्वांनी मोकळेपणाने खेळ केला. मीही त्यांना हेच म्हणालो होतो की, निर्भीड होऊन आपला खेळ खेळा. त्यानंतर आपण पाहू की काय होतंय.”
पुढे बोलताना सूर्या असेही म्हणाला की, “मला अक्षरला नेहमीच दबावात ठेवायला आवडते. त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ती अविश्वसनीय होती. अखेरच्या षटकांमध्ये आमची योजना यॉर्कर टाकण्याची होती. तसेच, पुढे काय होते ते पाहायचे होते.”
भारताचे दमदार प्रदर्शन
रायपूरमध्ये भारतीय संघाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. यावेळी भारताने रिंकू सिंग याच्या 46, यशस्वी जयसवाल याच्या 37, जितेश शर्मा याच्या 35 आणि ऋतुराज गायकवाड याच्या 32 धावांच्या जोरावर 20 षटकात 9 विकेट्स गमावत 174 धावा केल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना बेन ड्वारशुइस याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
दुसरीकडे, भारताच्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावत फक्त 154 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून कर्णधार मॅथ्यू वेड (Matthew Wade) यानेच नाबाद 36 धावांची सर्वोच्च खेळी केली. यावेळी भारताकडून अक्षर पटेल याने 3 विकेट्स घेतल्या. तसेच, दीपक चाहरने 2, तर रवी बिश्नोई आणि आवेश खान यांनीही प्रत्येकी 1 विकेटवर नाव कोरले.
मालिका खिशात
खरं तर, 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-1ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील अखेरचा सामना बंगळुरूत रविवारी (दि. 3 डिसेंबर) खेळला जाईल. यानंतर सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळेल. (ind vs aus 4th t20i match captain suryakumar yadav statement after win series against australia)
हेही वाचा-
चौथ्या टी-20 ऑस्ट्रेलियाला नाही गाठता आले 175 धावांचे आव्हान! भारताने साकारला सूर्यकुमारच्या नेतृत्वात पहिला मालिका विजय
आता भारताच्या गोलंदाजांची परीक्षा! रिंकू टिकल्यामुळे संघाची 174 धावांपर्यंत मजल