भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवली जात आहे. या मालिकेत तीन सामने खेळले गेले असून सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. भारतीय संघाने पहिला सामना 295 धावांनी जिंकला होता. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने पुनरागमन करत दुसरी कसोटी 10 विकेट्सने जिंकली. तिसरा सामना पावसामुळे वाहून गेला आणि कसोटी सामना अनिर्णित राहिला. आता मालिका मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर पोहोचली असून चौथा सामना 26 डिसेंबरपासून होणार आहे. मात्र याआधीच भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने निवृत्ती घेतली असून त्याच्या जागी बीसीसीआयने तनुष कोटियनची निवड केली आहे. या उलथापालथीनंतर, चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे प्लेईंग इलेव्हन कसे असेल हे पाहणे बाकी आहे.
युवा यशस्वी जयस्वाल आणि अनुभवी केएल राहुल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये सलामीची जबाबदारी स्वीकारली. पहिल्या कसोटीत यशस्वीने 161 धावांची खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तर राहुलने चांगली फलंदाजी केली. मात्र जयस्वाल दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत फ्लॉप ठरला असून त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात राहुलने 84 धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत हे दोन्ही खेळाडू चौथ्या कसोटी सामन्यात सलामी करताना दिसू शकतात.
शुबमन गिल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आतापर्यंत मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला असून तो खराब फॉर्मशी झुंजत आहे. आतापर्यंत मालिकेत त्याने 30, 28 आणि 1 धावांची इनिंग खेळली आहे. पण संघ व्यवस्थापन त्याला आणखी एक संधी देऊ शकते आणि तो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. सुपरस्टार फलंदाज विराट कोहली चौथ्या क्रमांकावर येणार हे जवळपास निश्चित दिसत आहे. एकदा तो क्रीजवर स्थिरावला की त्याला बाद करणे कठीण होऊन बसते. यष्टिरक्षकाची जबाबदारी रिषभ पंतकडे सोपवली जाऊ शकते. तर कर्णधार रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर उतरू शकतो.
जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसणार हे निश्वित आहे. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने मालिकेत अप्रतिम गोलंदाजी केली आहे. पहिल्या कसोटीत त्याने 8 विकेट्स घेत भारताला विजय मिळवून दिला होता. तिसऱ्या कसोटीत त्याने एकूण 9 विकेट्स घेतल्या. भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. त्याला साथ देण्यासाठी मोहम्मद सिराजच्या जागी प्रसिध कृष्णाला संघात संधी मिळू शकते. कारण सिराजला त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे तिसऱ्या सामन्यात आकाश दीप प्रभावी ठरला. अशा स्थितीत त्याला आणखी एक संधी मिळू शकते. नितीश रेड्डी आणि रवींद्र जडेजा यांना अष्टपैलू भूमिका दिल्या जाऊ शकतात.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप
हेही वाचा-
‘मी जिवंत आहे’, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विनोद कांबळीची प्रतिक्रिया समोर
IND vs AUS: मेलबर्नमध्ये अशी खेळपट्टी असेल, बुमराहसाठी आनंदाची बातमी, क्युरेटरचा खुलासा
2024 मध्ये एकाच दिवशी तीन बॉक्सिंग डे कसोटी सामने, IND vs AUS व्यतिरिक्त, हे संघ देखील मैदानात