भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरी कसोटी ब्रिस्बेनमधील गाबा येथे सुरू आहे. कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ आज (16 डिसेंबर) संपला. खेळ संपेपर्यंत भारतीय संघानं पहिल्या डावात चार गडी गमावून 51 धावा केल्या होत्या. सध्या केएल राहुल (33) आणि रोहित शर्मा (0) क्रीजवर आहेत.
सामन्याचा तिसरा दिवस पावसाच्या नावे राहिला. पावसामुळे सामन्यात अनेकदा व्यत्यय आला. मात्र, पावसात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचं धाडस पाहायला मिळालं. त्यांनी भारताला चार मोठे धक्के दिले. आता कसोटीचे फक्त दोन दिवस उरले असून भारतीय संघ बॅकफूटवर असल्याचं दिसत आहे. इथून भारताचा सामनाच काय फॉलोऑन वाचवण्यासाठी देखील खूप मेहनत करावी लागेल.
भारतीय संघाला फॉलोऑन वाचवण्यासाठी आणखी 195 धावांची गरज आहे. भारताकडे आता या सामन्यात 16 विकेट्स शिल्लक आहेत (पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 10). या सामन्यात आणखी 196 षटकं टाकायची आहेत. मात्र, पुढील दोन दिवस गाबामध्ये पावसाचा कहर असू शकतो. अशा स्थितीत सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 445 धावा केल्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियानं दुसऱ्याच चेंडूवर यशस्वी जयस्वालची विकेट गमावली. तो मिचेल स्टार्कच्या चेंडूवर फ्लिक शॉट खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्यानंतर स्टार्कने त्याच्या पुढच्याच षटकात शुबमन गिललाही (1 धावा) बाद केलं. मार्शनं गिलचा झेल घेतला.
विराट कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तोही जोश हेझलवूडच्या चेंडूवर यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीकडे झेलबाद झाला. कोहलीनं 16 चेंडूंचा सामना करत 3 धावा केल्या. त्यानंतर रिषभ पंतही (9) पॅट कमिन्सच्या चेंडूवर कॅरीच्या हाती झेलबाद झाला. पंत बाद झाल्यानंतर पाऊस सुरू झाला. त्यामुळे जास्त खेळ होऊ शकला नाही.
यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा मैदानावर सात कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतीय संघ 5 सामने हरला आणि एक सामना अनिर्णितही राहिला. जानेवारी 2021 मध्ये गाबा येथे भारतीय संघानं एकमेव कसोटी विजय मिळवला होता. त्यावेळी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा तीन गडी राखून पराभव केला होता.
हेही वाचा –
गाबा टेस्ट पावसामुळे रद्द झाली तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? ताजं समीकरण जाणून घ्या
ये रे माझ्या मागल्या! ऑस्ट्रेलियात भारतीय फलंदाज सतत फ्लॉप का होत आहेत?
गाबा कसोटीत रोहित शर्मानं केल्या या 3 मोठ्या चुका, कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह