ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना 10 गडी राखून जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. तिसरी कसोटी शनिवार (14 डिसेंबर) पासून ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळली जाईल. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं शानदार कामगिरी केली होती, मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूसमोर भारतीय फलंदाज निष्प्रभ ठरले. आता तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे काही खेळाडू मोठी कामगिरी करू शकतात. ही कामगिरी काय आहे हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
2020-21 मध्ये गाबा येथे झालेल्या कसोटीत यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत भारताच्या विजयाचा हिरो ठरला होता. पंतनं आगामी कसोटीत 220 धावा केल्या, तर तो कसोटीत 3000 धावांचा टप्पा गाठेल. यासह तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या बाबतीत कर्णधार रोहित शर्मालाही मागे टाकू शकतो. रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 717 धावांना मागे टाकण्यासाठी पंतला केवळ सहा धावांची आवश्यकता आहे.
दुसरीकडे, भारताचा उगवता खेळाडू शुबमन गिलला कसोटीत 2000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. हा आकडा गाठण्यासाठी गिलला 141 धावांची आवश्यकता आहे. त्यानं अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर महेंद्रसिंह धोनीच्या 311 कसोटी धावांचा आकडा मागे टाकला होता.
या कसोटीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडेही मोठा पल्ला गाठण्याची संधी आहे. बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट घेण्यापासून फक्त 15 विकेट्स दूर आहे. याशिवाय त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 विकेट्स घेण्यासाठी फक्त 6 विकेट्सची गरज आहे. तसेच बुमराहनं आठ विकेट घेतल्यास, तो महान कपिल देव (51) यांना मागे टाकून ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज बनेल.
बुमराहशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही या कसोटीत एक मैलाचा दगड गाठू शकतो. सिराज कसोटी क्रिकेटमध्ये 100 बळींचा टप्पा गाठण्यापासून केवळ 11 विकेट्स दूर आहे.
हेही वाचा –
स्मृती मंधानाच्या शतकानंतरही भारताच्या हाती निराशा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा व्हाईटवॉश
हार्दिक पांड्याची घातक गोलंदाजी, संघाची उपांत्य फेरीत धडक; मोहम्मद शमीनेही मोठा विक्रम केला!
जसप्रीत बुमराहच्या हाती निराशा, पाकिस्तानी खेळाडूनं जिंकला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार