भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण 17 विकेट पडल्या. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 150 रन्सवर ऑलआऊट झाली. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियानं 7 विकेट गमावून 67 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहनं 4 बळी घेतले, तर मोहम्मद सिराजला 2 बळी मिळाले. आता सामना पूर्णपणे भारताच्या ताब्यात आहे.
भारतीय संघ 150 धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ आता खूप पुढे असल्याचं दिसत होतं. परंतु भारतीय गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करवला. टीम इंडिया आता 150 धावा करूनही पहिल्या डावात आघाडी घेऊ शकते. पहिल्या दिवशी सर्व 17 विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतल्या.
भारताच्या 150 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पदार्पणाच्या कसोटीत नॅथन मॅकस्विनी 13 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने केवळ 10 धावा करून बाद झाला. यानंतर उस्मान ख्वाजा 8 देखील स्वस्तात गेला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्टीव्ह स्मिथला खातंही उघडता आलं नाही. जसप्रीत बुमराहनं या तिघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
19 धावांवर तीन विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन चाहत्यांना ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण भारतीय गोलंदाजांनी तसं होऊ दिलं नाही. वेगवान गोलंदाज हर्षित राणानं पदार्पणाच्या कसोटीत ट्रॅव्हिस हेडला बाद केलं. तो दोन चौकारांच्या मदतीनं 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर मिचेल मार्शही सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्नस लाबुशेन 52 चेंडूत केवळ दोन धावा करू शकला. सिराजनं दोघांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
एका बाजूनं ऑस्ट्रेलिाच्या विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूनं यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरी खंबीरपणे उभा राहिला. तो सध्या तीन चौकारांच्या मदतीनं 19 धावा करून नाबाद आहे. कर्णधार पॅट कमिन्स तीन धावा करून बाद झाला. ही पहिल्या दिवसाची शेवटची विकेट होती. कॅरीसह मिचेल स्टार्क सहा धावांवर नाबाद आहे. सध्या भारताकडे 83 धावांची आघाडी आहे.
हेही वाचा –
ऑस्ट्रेलियात पारा चढतोय! सिराज-लाबुशेन एकमेकांशी भिडले, बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल
नितीश रेड्डीनं भारताची लाज राखली, पदार्पणाच्या कसोटीत धमाल कामगिरी!
IPL; बीसीसीआयचा नवा नियम येताच विदेशी खेळाडूंचा सूर बदलला, पुढील तीन हंगामांसाठी मोठा निर्णय!